महिला सक्षमीकरणासाठी आम्ही नेहमीच प्रोत्साहन देतो.
क्रीकेट विजयानंतर पंतप्रधान मोदी यांची प्रतिक्रिया
► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
पन्नास षटकांची महिला विश्वचषक स्पर्धा भारताने जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय महिला संघाचे अभिनंदन केले आहे. भारतीय महिला खेळाडूंचा निर्धार आणि धीरोदात्तपणा कौतुकास्पद असून त्यांच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे साऱ्या देशाला त्यांच्याविषयी अभिमान आहे. भारताच्या क्रीडा इतिहासातील हा सर्वात अभिमानाचा क्षण आहे, अशी भलावण त्यांनी केली आहे.
आपली प्रतिक्रिया त्यांनी बिहारमधील सहरसा येथे एका विशाल जनसमुदायासमोर विधानसभा निवडणूक प्रचारचे भाषण करताना व्यक्त केली आहे भारतीय महिलांनी क्रीकेट विश्वचषक प्रथमच जिंकला आहे. या विजयाचे श्रेय आपल्या महिला खेळाडूंच्या कष्टांना आणि निर्धाराला आहे. या यशामुळे इतर क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनाही मोठे प्रोत्साहन मिळणार असून असा विजय आपापल्या क्षेत्रात मिळविण्याची प्रेरणा त्यांना मिळणार आहे. केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारने नेहमीच महिलांच्या कर्तृत्वाचा कृतीशील सन्मान केला असून त्यांना उत्तम कामगिरी करण्यास प्रोत्साहन दिले आहे. अनेक क्षेत्रांमध्ये आज महिला यशाची शिखरे गाठत आहेत, असे प्रतिपादन त्यांनी भाषणात केले.
त्यांच्या पालकांचेही अभिनंदन
या विजयासाठी केवळ महिला क्रीकेट खेळाडूंचेच नव्हे, तर त्यांच्या मातापित्यांचेही अभिनंदन करण्याची आवश्यकता आहे. त्यांनी आपल्या कन्यांचे अंगभूत गुण ओळखून त्यांना संधी आणि प्रोत्साहन दिले. महिलांना संधी मिळाल्यास त्या कोणत्याही क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करुन दाखवू शकतात, याची प्रचीती या विजयामुळे आली आहे. आज भारतीय महिला युद्धात विमाने चालवित आहेत. आपल्या देशाच्या सीमांचे संरक्षण करीत आहेत. आमच्या सरकारने केंद्रात सत्तेवर आल्यानंतर त्वरित ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ हा नारा दिला होता. आमच्या विरोधकांनी त्याची खिल्ली उडविली होती. पण आज विविध क्षेत्रांमध्ये महिलांनी होत असलेली प्रगती पाहताना हा नारा किती सार्थ आहे, याची जाणीव होत आहे. यापुढेही आम्ही नेहमीच महिलांच्या सर्वांगिण प्रगतीसाठी त्यांना अशाच प्रकारे प्रोत्साहित करत राहू, असे आश्वासनही त्यांनी भाषणात दिले आहे.
			
											
Comments are closed.