गुलाम मानसिकतेतून बाहेर यायला हवे.
पंतप्रधान मोदी यांचे गोयंका स्मृती व्याख्यान विचार
वृत्तसंस्था/नवी दिल्ली
ब्रिटीशांच्या काळातील गुलामगिरीच्या मानसिकतेतून आता भारताला मुक्त व्हावे लागेल, असा स्पष्ट संदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. यासाठी त्यांनी 10 वर्षांचा एक दिशादर्शक कार्यक्रमही देशाला दिला आहे. ब्रिटीशांच्या काळात मेकॉले याने भारतीयांमध्ये गुलामगिरीची भावना निर्माण व्हावी, अशा प्रकारची शिक्षण आणि कायदा पद्धती लागू केली होती. ती आपण सोडली पाहिजे आणि स्वाभिमान जागृत होईल आणि राष्ट्रभावनेला प्राधान्य मिळेल अशी व्यवस्था आपण स्वीकारली पाहिजे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते मंगळवारी सहाव्या रामनाथ गोयंका स्मृत कार्यक्रमात व्याख्यान देत होते. भारतीयांना गुलामीच्या मानसिकतेत नेण्यासाठी 1835 मध्ये ब्रिटीश संसद सदस्य थॉमस बॅबिंग्टन मेकॉले याने एक व्यापक योजना साकारली. भारतीयांना त्यांचे पारंपरिक ज्ञान, संस्कृती आणि विज्ञान विसरायला लावणे आणि त्यांच्या मनात ब्रिटीश जीवनपद्धती, पाश्चिमात्य संस्कृती आणि पाश्चिमात्य विज्ञान यांच्याविषयी आदरभाव निर्माण होईल, अशी व्यवस्था करणे हा या योजनेचा प्रमुख भाग होता.
भारतीयांना स्वत:विषयी, स्वत:च्या इतिहासाविषयी आणि स्वत:च्या संस्कृतीविषयी कमीपणा वाटला पाहिजे. त्यांच्या मनात न्यूनगंड निर्माण झाला पाहिजे. तरच ब्रिटीशांचे राज्य भारतावर सुखनैव चालेल, असे मेकॉलेचे तत्वज्ञान होते. त्याच्या योजनेनुसार भारताची शिक्षण पद्धती आणि इतर जीवनविषयक पद्धती परिवर्तित करण्यात आली. याचा परिणाम म्हणून भारताचाच तिरस्कार करणारी एक पिढी भारतात जन्माला आली आणि वाढली. आजही या मेकॉले संस्कृतीचा प्रभाव आपल्यावर आहे. त्यामुळे आपण ‘स्वत्व’ विसरलो आहोत. जे भारतीय आहे, त्याच्याविषयी आपल्या मनात एक अढी असते आणि जे पाश्चिमात्य आहे, तेच श्रेष्ठ ही भावना आपल्या मनात पक्की रुजलेली असते. या भावनेचा भारताच्या प्रगतीत आणि विकासात मोठा अडसर आहे. नवे ज्ञान, नवे तंत्रज्ञान आणि नव्या बाबींचा स्वीकार करताना आपण आपली मुळे विसरता कामा नयेत. तसे झाल्यासच आपण स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून विकसीत होऊ, अशा अर्थाचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका कार्यक्रमात केले.
10 वर्षांचा कार्यक्रम
येत्या दहा वर्षांमध्ये भारतीयांनी आपली ही गुलामीची मानसिकता सोडण्याचा निर्धार करावा. नव्या आवश्यक ज्ञानाचा स्वीकार करतानाच पारंपरिक भारतीय ज्ञानाचाही विकास करण्याचा प्रयत्न करावा. 2035 मध्ये मेकॉले याच्या भारतविरोध तत्वज्ञानाला 200 वर्षे पूर्ण होत आहेत. मेकॉलेच्या तत्वाज्ञानाची द्विशताब्दी होण्याच्या आत आपण त्याने निर्माण केलेल्या मानसिकतेतून आपल्याला बाहेर पडायचे आहे, असा निश्चय आपण केल्यास ते सहज शक्य आहे. भारतीयांना ते शक्य होईल, असा विश्वास त्यांनी या संदेशात व्यक्त केला आहे.
इतर देशांची उदाहरणे
जपान, चीन आणि दक्षिण कोरिया या देशांनी पाश्चिमात्यांच्या तंत्रज्ञानाचा, ज्ञानाचा आणि काही चालीरितींचा स्वीकार केला आहे. या बाबींचा उपयोग त्यांनी आपल्या देशांचा विकास घडविण्यासाठीही केला आहे. तथापि, हे करत असताना त्यांनी आपली भाषा, आपली संस्कृती आणि आपले पारंपरिक ज्ञान यांना कधीही कमी लेखलेले नाही. उलट त्यांच्यासंबंधी आपल्या देशाच्या नागरीकांच्या मनात अभिमान जागृत ठेवला आहे. त्यामुळे या देशांची तंत्रवैज्ञानिक प्रगती पाश्चात्य राष्ट्रांच्या तोडीस तोड झाली असली तरी त्यांनी आपले ‘स्वत्व’ गमावलेले नाही. भारतालाही असेच करावे लागणार आहे. कारण, तसे केल्याशिवाय आपल्या स्वाभानाची जोपासना होणार नाही. देशाच्या खऱ्या प्रगतीसाठी इतरांच्या संस्कृतीचे अनुकरण नव्हे, तर स्वसंस्कृतीची जोपासना होणे महत्वाचे आहे. करायची आहे, असे वैचारिक प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
Comments are closed.