एजबॅस्टन टेस्टमध्ये ड्रॉसाठी खेळेल इंग्लंड? कोच म्हणाले ,'आम्ही इतके मूर्ख नाही की…'
भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या एजबॅस्टन कसोटीत टीम इंडियाने इंग्लंडपुढे 608 धावांचे प्रचंड लक्ष्य ठेवले आहे. प्रत्युत्तरात इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर 72 धावांवर 3 बळी गमावले आहेत. अखेरच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी अजून 536 धावांची गरज आहे. अशा कठीण परिस्थितीत आता इंग्लंडचा ‘बेसबॉल’ क्रिकेटचा आक्रमक अंदाज बाजूला ठेवून सामना वाचवण्यावर लक्ष केंद्रित करणार का, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
इंग्लंडचे फलंदाजी प्रशिक्षक मार्कस ट्रेस्कोथिक यांनी यावर मोठं विधान केलं आहे. त्यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही इतके मूर्ख नाही की फक्त विजय किंवा पराभव याच विचारात अडकून राहू. टेस्ट क्रिकेटमध्ये तीन शक्यतांचा विचार केला जातो – विजय, पराभव किंवा ड्रॉ. जर सामना जिंकणे शक्य नसेल, तर आम्ही ड्रॉ खेळण्याची शक्यता नाकारत नाही.”
ट्रेस्कोथिक पुढे म्हणाले, “आम्ही आमच्या क्रिकेटमध्ये काही गोष्टी वेगळ्या केल्या आहेत. त्यामुळे परिस्थितीनुसार काय घडतंय हे पाहू. आम्ही ड्रेसिंग रूममध्ये ड्रॉ संदर्भात फार चर्चा करत नाही, पण काही खेळाडू परिस्थितीशी जुळवून घेऊन आपली रणनीती बदलतात.”
“हे आमचं ड्रेसिंग रूम वेगळं आहे. आम्ही पूर्वीपेक्षा आता वेगळी संस्कृती स्वीकारली आहे. काही खेळाडू असतात जे गरजेनुसार ‘बंकर मोड’मध्ये जाऊ शकतात आणि सामना वाचवण्याचा प्रयत्न करू शकतात. कोण काय करेल, हे निश्चित सांगता येत नाही,” असंही ट्रेस्कोथिक यांनी सांगितलं.
एकंदरीत, इंग्लंडच्या ड्रेसिंग रूममध्ये आता केवळ आक्रमणाची नाही तर वास्तववादी रणनीतीची चर्चा होत आहे. आता पाहायचं म्हणजे, इंग्लंड एजबेस्टनच्या पाचव्या दिवशी ऐतिहासिक विजयासाठी खेळते की हार टाळून ‘ड्रॉ’ मिळवण्याचा प्रयत्न करते. तर टीम इंडियाही लवकरात लवकर 7 विकेट्स घेऊन सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल.
Comments are closed.