पश्चिम बंगालमधील अराजकता आम्ही संपवू.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची गर्जना : ममता सरकारविरोधात पुन्हा एकदा आवाज बुलंद : आसाम, प. बंगालचा दौरा यशस्वी

वृत्तसंस्था/ सिंगूर, काझिरंगा

गेल्या दोन दिवसांपासून पूर्व भारताच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पुन्हा एकदा ममता बॅनर्जींवर थेट हल्लाबोल केला. आसाम दौऱ्यानंतर पंतप्रधान मोदी रविवारी पुन्हा पश्चिम बंगालमध्ये पोहोचले. कोलकाता येथे पोहोचल्यानंतर त्यांनी हुगळी जिह्यातील सिंगूर येथे एका सरकारी कार्यक्रमात भाग घेतला. त्यानंतर त्यांनी सिंगूर येथे एका सभेला संबोधित करताना राज्यातील जंगलराज संपविण्याची गर्जना केली. तसेच मागील 24 तास पश्चिम बंगाल आणि देशासाठी ऐतिहासिक ठरल्याचेही त्यांनी सिंगूर येथील सभेत जाहीर केले.

पश्चिम बंगालमधील सध्याचे सरकार गरिबांचे हक्क हिरावून घेत आहेत. राज्यातील घुसखोर हे तृणमूल काँग्रेसचे निष्ठावंत मतदार असल्यामुळे ते त्यांचे संरक्षण आणि रक्षण करत आहेत. मात्र, येथे भाजपला संधी मिळताच घुसखोरांना थारा दिला जाणार नाही, असे मोदी म्हणाले. राज्यात सध्या केंद्र सरकारच्या माध्यमातून विकासकामे झपाट्याने सुरू आहेत. इतक्या कमी कालावधीत जितके विकासकाम झाले आहे ते गेल्या 100 वर्षांतही साध्य झाले नसेल. विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी पूर्व भारताचा विकास अत्यंत महत्त्वाचा असून केंद्र सरकार या दिशेने सतत काम करत असल्याचे ते पुढे म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी पश्चिम बंगालमध्ये बोलताना येथील लोकांना आता खरा बदल हवा आहे. प्रत्येकाला 15 वर्षांचे जंगलराज बदलायचे आहे. भाजप-एनडीएने बिहारमध्ये जंगलराज थांबवले आहे. आता, ते तृणमूल काँग्रेसचे जंगलराज हद्दपार करण्यास तयार आहेत, असे स्पष्ट केले. घुसखोरांना संरक्षण देण्यासाठी तृणमूल काँग्रेस कोणत्याही थराला जाईल. केंद्र सरकारने सीमेवर कुंपण घालण्यासाठी जमिनीची मागणी करणारे अनेक पत्र लिहिले आहेत. परंतु बंगाल सरकारला याची चिंता नाही कारण घुसखोर हे त्यांचे निष्ठावंत मतदार आहेत, असे सिंगूरमधील एका जाहीर सभेला संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले.

आसामच्या दौऱ्यात प्रकल्पांची पायाभरणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममधील कालियाबोर येथे हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे उद्घाटन केले. त्यांनी काझिरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरची पायाभरणी केली. आपल्या भाषणात पंतप्रधानांनी काँग्रेस पक्षाला विकासविरोधी ठरवत त्यांच्यावर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आसाममधील काझिरंगा एलिव्हेटेड कॉरिडॉरची पायाभरणी केली. वन्यप्राण्यांच्या सुरक्षेसाठी येथे 90 किमी लांबीचा कॉरिडॉर विकसित केला जात आहे. यावर 7,000 कोटी रुपये खर्च केले जातील. हा कॉरिडॉर वन्यजीव संवर्धन आणि पर्यटकांच्या सोयींमध्ये संतुलन साधेल. हा प्रकल्प केवळ या प्रदेशातील वाहतूक सुलभ करणार नाही तर काझिरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या सुरक्षिततेसाठी आणि कनेक्टिव्हिटीसाठी एक मैलाचा दगड ठरेल, असा दावा त्यांनी केला. याव्यतिरिक्त पंतप्रधानांनी आसामच्या विकासाला गती देण्यासाठी दोन नवीन अमृत भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला. अमृत भारत एक्स्प्रेसच्या दिब्रुगड-गोमती नगर (लखनौ) आणि कामाख्या-रोहतक या दोन नव्या गाड्यांचा लाभ पूर्व भारतातील लोकांना होणार आहे.

ममतांवर सडकून टीका

तृणमूल काँग्रेसच्या राजवटीत मुली सुरक्षित नाहीत. येथील शिक्षण व्यवस्था माफिया आणि भ्रष्ट व्यक्तींच्या नियंत्रणाखाली आहे. तृणमूल काँग्रेसच्या सर्वात लहान नेत्यानेही स्वत:ला बंगालचा पालक मानण्यास सुरुवात केली आहे. शिक्षक भरती घोटाळ्यासाठी त्यांनी हुगलीची बदनामी केली आहे. भाजप त्यांना शिक्षा करेल. माफिया आणि दंगलखोरांना रोखल्यास बंगालमध्ये गुंतवणूक येईल. बंगालमधील तरुण, शेतकरी, माता आणि भगिनींची सर्वतोपरी सेवा करण्याचा आमचा प्रयत्न आहे. येथील तृणमूल काँग्रेस सरकार केंद्र सरकारच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाही, असे अनेक आरोप मोदींनी ममता बॅनर्जींच्या नेतृत्त्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारवर केले.

आसामच्या विकासासाठी भाजप कटिबद्ध

गेल्या काही वर्षांत काझिरंगातील पर्यटकांची संख्या वाढली आहे. यामुळे मार्गदर्शक, ट्रॅव्हल एजन्सी, हॉटेल्स, हस्तकला कलाकार आणि स्थानिक लोकांसाठी उत्पन्नाच्या नवीन संधी उपलब्ध झाल्या आहेत. आज विकास साध्य करताना वारसा कसा जपता येतो हे आसाम जगाला दाखवत आहे. भाजपकडून आसामसोबतच ईशान्येकडील विकासाला प्राधान्य देण्यात येत आहे. काँग्रेसने आसामच्या मातीत घुसखोरांना थारा दिला. त्यांच्या सरकारच्या काळात आसाममध्ये घुसखोरी वाढली. काँग्रेसला आसामच्या इतिहासाची, संस्कृतीची किंवा श्रद्धेची काहीच पर्वा नव्हती, असा हल्लाबोलही पंतप्रधानांनी केला.

Comments are closed.