आम्ही लोकसंख्याशास्त्रीय बदल होऊ देणार नाही!
त्रिपुरा सीमेवर गृहमंत्री अमित शाह यांचा कठोर संदेश : सीमेवर स्मार्ट सुरक्षा प्रणाली लवकरच
वृत्तसंस्था/ अगरतळा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शुक्रवारी त्रिपुरामध्ये भारत-बांगलादेश सीमेवर लंकामुरा बॉर्डर आउटपोस्टवर बीएसएफ जवानांना संबोधित केले. त्रिपुरा फ्रंटियर आमच्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अहे. त्रिपुरा असो किंवा बंगाल किंवा बिहार आम्ही डेमोग्राफिक (लोकसंख्यात्मक) परिवर्तन घडू देणार नाही. हा आमचा अतूट संकल्प आहे असे उद्गार शाह यांनी यावेळी काढले आहेत. सीमावर्ती राज्यांमधील काही राज्यांमध्ये लोकसंख्यात्मक परिवर्तन स्पष्टपणे दिसून येत असल्याने सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर शाह यांनी हे वक्तव्य केले आहे.
बीएसएफ देशाच्या पाकिस्तान अन् बांगलादेशला लागून असलेल्या सीमांच्या सुरक्षेची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडत आहे. दोन्ही सीमांवरील आव्हानांचे स्वरुप वेगवेगळे आहे आणि प्रत्येक सीमेची स्वत:ची विशेष सुरक्षा आवश्यकता आहे. अनेक ठिकाणी अमली पदार्थांच्या तस्करीचे आव्हान आहे, तर काही ठिकाणी मानवी तस्करीची समस्या आहे. काही क्षेत्रांमध्ये शस्त्रास्त्र तस्करी आणि बनावट नोटांचे नेटवर्कही सक्रीय आहे. याचमुळे प्रत्येक सीमेसाठी वेगळ्या रणनीतिची आवश्यकता असते असे शाह यांनी म्हटले आहे.
बीएसएफ जेथे-जेथे तैनात आहे, तिथे स्मार्ट बॉर्डर प्रणाली विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याच्या अंतर्गत आधुनिक तंत्रज्ञान, सुरक्षा दल आणि स्थानिक प्रशासनाच्या समन्वयाद्वारे सीमांना अधिक सुरक्षित करण्यात येणार असल्याचे शाह यांनी स्पष्ट केले.
जागतिक पर्यावरण दिनाचा उल्लेख करत गृहमंत्र्यांनी बीएसएफ आणि सीएपीएफच्या जवानांकडून करण्यात येणाऱ्या वृक्षारोपण प्रयत्नांचे कौतुक केले. रोप लावणे आणि त्याची देखभाल करणे केवळ शासकीय कार्यक्रम ठरू नये तर हे आमच्या जीवनशैलीचा हिस्सा ठरावे. पर्यावरण संरक्षणाबद्दल जागरुकता काळाची आवश्यकता आहे. बीएसएफ चौकी आणि अन्य मूलभूत सुविधांच्या निर्मितीकरता वृक्षतोड झाली असून त्याच्या भरपाईसाठी अधिक संख्येत वृक्ष लागवड करणे आमची सामूहिक जबाबदारी आहे. वाढते जागतिक तापमान, हवामान बदल आणि ओझोन थराला होत असलेले नुकसान भविष्यासाठी गंभीर आव्हान आहे. यावर वेळीच प्रभावी पावले न उचलण्यात आल्यास याचा प्रभाव पूर्ण जगावर पडेल, असे शाह यांनी म्हटले आहे.
शाह यांनी यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिवराव गोळवलकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. गोळवलकर यांनी स्वत:चे पूर्ण जीवन राष्ट्रसेवेसाठी समर्पित केले. त्यांनी धैर्य, परिश्रम आणि मातृभूमीबद्दल समर्पणासोबत काम केले. त्यांच्या नेतृत्वात लाखो असे कार्यकर्ते तयार झाले, जे देशाची संस्कृती, इतिहास, भाषा, सुरक्षा आणि स्वाभिमानाबद्दल गर्व करतात असे उद्गार शाह यांनी काढले आहेत.
Comments are closed.