अण्वस्त्रांच्या मागे लपून बसलेल्यांनाही आम्ही मारू!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा, ही तर केवळ संघर्षस्थगिती, समाप्ती नाही
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
‘आमचा संघर्ष दहशतवादाशी आहे. दहशतवाद संपेपर्यंत तो केला जाणार आहे. आम्हाला कोणी अणुयुद्धाची धमकी दिली, तरी हा संघर्ष आम्ही सोडणार नाही. अण्वस्त्रांच्या आड लपलेल्यांवरही आम्ही अचूक वार करुन त्यांना संपविण्याचे सामर्थ्य आमच्या सेनादलांमध्ये आहे. पाकिस्तानला ही अंतिम संधी आहे. आमचे ‘सिंदूर’ अभियान समाप्त झालेले नसून त्याला आम्ही केवळ स्थगिती दिली आहे. आम्ही पाकिस्तानच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहोत. त्याने कोणतीही कुरापत काढण्याचा प्रयत्न केला, तरी त्याला त्याचे भयानक परिणाम भोगावे लागतील, असा घणाघाती इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिला आहे. पंतप्रधानांनी सोमवारी रात्री आठ वाजता देशवासियांना संबोधून केलेल्या आपल्या संदेशात भारताच्या सेनादलांची तोंड भरून प्रशंसा केली आहे.
भारत आणि पाकिस्तानचा शस्त्रसंघर्ष आणि त्यानंतर दोन्ही देशांमध्ये झालेली शस्त्रसंधी यांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून संदेश देताना, भारताची भूमिका सडेतोडपणे स्पष्ट केली. सध्याची ही संघर्ष स्थगिती आम्ही आमच्या अटींवर स्वीकारली आहे. शस्त्रसंधीचा प्रस्ताव आम्ही ठेवला नव्हता. तो पाकिस्तानकडून आल्यानतंर आम्ही तो स्वीकारला आहे. मात्र, याचा अर्थ असा नाही, की आम्ही पाकिस्तानला क्षमा केली आहे. पाकिस्तानला त्याच्या क्रूर आणि अमानवी कृतीची शिक्षा आम्ही देतच राहणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
कुंकवाच्या किमतीचे दिले प्रत्यंतर
पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला पहलगाम येथील निर्दोष आणि नि:शस्त्र पर्यटकांवर अत्यंत निर्घृणपणे हल्ला करून त्यांचा बळी घेतला. त्यांच्या धर्म विचारून त्यांना मारण्यात आले. दहशतवाद्यांनी अनेक महिलांच्या कपाळावरचे कुंकू आणि त्यांचा सिंदूर पती-मुलांच्या डोळ्यांच्या देखत पुसण्याचे घृणित कृत्य केले. या सिंदूरची आणि कुंकवाची किंमत किती भयानक प्रकारे मोजावी लागते, याचे प्रत्यंतर आज या दहशतवाद्यांना आणून दिले गेले आहे. केवळ दहशतवाद्यांना नाही तर त्यांचे भरणपोषण करणाऱ्या देशाला आणि या दहशतवाद्यांच्या म्होरक्यांनाही आम्ही आमच्या सामर्थ्याच्या आगीची धग अनुभवावयास लावली आहे. आमचे मुख्य उद्दिष्ट्या अशा प्रकारे आम्ही साध्य केले असून यापुढेही दहशतवादी जिथे असतील, तिथे त्यांचा खात्मा करण्याचे अभियान होतच राहील, अशा निर्णायक भाषेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना ठणकावले आहे.
पाकिस्तानची अतोनात हानी
दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला केलेल्या हल्ल्याचा प्रतिशोध भारताने 7 मे या दिवशी पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांवर अचूक आणि अनपेक्षित हल्ले करून घेतला आहे. या हल्ल्यात 100 हून अधिक दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले आहे. यावेळी पाकिस्तानने आम्हाला सहकार्य करणे आवश्यक होते. तथापि, पाकिस्तानच्या सैन्याने आमच्यावरच हल्ले करण्याचा प्रयत्न करत आपण कोणाच्या बाजूने आहोत, याचे निर्लज्ज प्रदर्शन जगासमोर केले. त्यामुळे आम्हाला पाकिस्तानच्या सैन्यव्यवस्थेलाही प्रचंड दणका द्यावा लागला. त्यांचे अनेक वायुतळ आणि रडारव्यवस्था तसेच सैन्यसाधने आमच्या अचूक क्षेपणास्त्र माऱ्यामुळे उद्ध्वस्त झाली आहेत. ही हानी पाकिस्तानने स्वत:हून ओढवून घेतली आहे. यापुढेही त्या देशाचे हेच धोरण ठेवले, तर आम्ही गय करणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्वदेशनिर्मित शस्त्रांचा पराक्रम
पाकिस्तानच्या हल्ल्यावर आम्ही अत्यंत विध्वंसक प्रतिहल्ला केला आहे. तो करण्यासाठी आम्ही भारतनिर्मिती शस्त्रप्रणालींचा उपयोग केला. या स्वदेशनिर्मिती शस्त्रांनी पाकिस्तानला अक्षरश: वाकायला लावले. आमच्या शस्त्रांची ही परिणामकारकता, अचूकता आणि भेदकता साऱ्या जगाला आता ज्ञात झाली आहे. आमचे विलक्षण सामर्थ्य आम्ही दाखविले, अशीही भलावण त्यांनी संदेशात केली.
सैन्यदलांचा पराक्रम अद्वितीय
भारताच्या सैन्यदलांनी या अभियानात केलेला पराक्रम अतुलनीय आहे. त्यांनी अत्यंत संयमाने आणि अचूकपणे आपली निर्धारित कामगिरी करून दाखविलेली आहे. त्यांच्या पराक्रमाचे आज केवळ देशातच नव्हे, तर जगात कौतुक होत आहे. आपल्या सैन्यदलांनी पाकिस्तानला जो धडा शिकविला आहे, तो अभूतपूर्व असून त्याची दखल साऱ्या जगाने घेतली आहे, असे प्रतिपादन पंतप्रधानांनी केले आहे.
दहशतवाद आणि व्यापार एकत्र नाही
दहशतवाद आणि व्यापार एकाचवेळी होणे शक्य नाही, असे स्पष्ट करत त्यांनी पाकिस्तानसंबंधीचे भारताचे व्यापार धोरणही स्पष्ट केले. पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानशी सर्व व्यापार थांबविला आहे. तो शस्त्रसंधीनंतरही थांबलेल्या स्थितीतच राहील, याचे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले.
रक्त आणि पाणी एकत्र वाहणार नाही
भारताने सिंधू जलवितरण कराराला स्थगिती दिली आहे. ही स्थगिती शस्त्रसंधीनंतर राहणार आहे, याचेही स्पष्ट संकेत त्यांनी दिले. रक्त आणि पाणी एकत्र वाहू शकत नाही, हे पाकिस्तानने लक्षात घ्यावे. भारत यासंबंधातील आपले धोरण सोडणार नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी या संदेशातून दिला आहे.
Comments are closed.