'आम्ही त्यांना कल्पना करण्यापेक्षा कठोर धडा शिकवू'

दहशतवादाची शेवटची भूमी नष्ट करणे आवश्यक : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला घणाघाती इशारा

वर्तुळ/मधुबानी (बिहार)

धर्मांध दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पेहलगाम येथे भारताच्या निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला केला आहे. या दहशतवाद्यांना आणि त्यांच्या सूत्रधारांना आम्ही त्यांच्या कल्पनेपेक्षाही अधिक कठोर धडा शिकविणार आहोत. त्यांना शोधून काढून नष्ट करण्यासाठी पृथ्वीवर कोणत्याही स्थानी जाण्यासा आम्ही सज्ज आहोत. पेहलगाम येथील हल्ल्यात मृत झालेल्या नागरीकांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांवर घणाघात केला आहे. ते बिहार राज्याच्या मधुबनी येथे एका जाहीर सभेत भाषण करीत होते. पेहलगाम हल्ल्यानंतरची त्यांची ही प्रथमच प्रकट सभा होती. आपला संदेश साऱ्या जगाला आणि विशेषत: दहशतवाद्यांपर्यंत पोहचविण्यासाठी त्यांनी आपल्या भाषणात काही वेळ इंग्रजी भाषेचा उपयोग केला. अशा साऱ्या देशात संतापाची लाट उसळली आहे. सरकारला याची जाणीव आहे. भारत दहशतवाद्यांच्या हल्ल्यांना कल्पनातीत पद्धतीने प्रत्युत्तर देईल. निरपराध पर्यटकांच्या रक्ताच्या थेंबाथेंबाचा प्रतिशोध घेतला जाईल, असे ठाम प्रतिपादन त्यांनी आपल्या भाषणात केले.

सैल सोडणार नाही…

दहशतवादाला सैल सोडले जाणार नाही. त्याचा नाश ठरलेला आहे. या हल्ल्यात बळी पडलेल्यांना न्याय देण्यासाठी जे आवश्यक आहे, ते सर्व केले जाईल. आज सारा देश एकजूट झाला असून दहशतवाद संपविणे हे त्याचे ध्येय आहे. आज सर्व मानवता आमच्या बाजूने एक झाली आहे. या हल्ल्यानंतर जगातील अनेक देश आणि त्यांची सरकारे आमच्या पाठीशी उभी राहिली आहेत. त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे. भारत सरकार कोणत्याही स्थितीत या हल्ल्याचा प्रतिशोध घेईलच. त्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार आहे, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

घेतले अनेक निर्णय

या हल्ल्यामागे पाकिस्तानच आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यानंतर भारताने पाकिस्तानची नांगी मोडण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. 1960 पासून पाकिस्तानशी असलेला सिंधू खोरे जलवितरण करार स्थगित करण्यात आला आहे. जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला प्रोत्साहन देणे बंद करणार नाही, तोपर्यंत या कराराचे कार्यान्वयन करु दिले जाणार नाही. पाकिस्तानच्या नागरीकांना भारतात येण्यासाठी विनामूल्य व्हिसेही देले जाणार नाहीत. तसेच पाकिस्तानच्या अनेक मुत्सद्द्यांना भारत माघारी धाडणार असून अत्तारी सीमारेषेवरील चौकीही बंद केली जाणार आहे. त्यामुळे पाकिस्तानी नागरीकांना भारतात येणाचा मार्ग बंद होणार आहे, अशी माहिती देण्यात आली.

पाकिस्तानचीही उच्चस्तरीय बैठक

भारताची निर्माण झालेला तणाव पाहता पाकिस्तानच्या प्रशासनानेही उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन केले होते. भारताने दु:साहस केल्यास त्याला धडा शिकविण्याची आमची तयारी आहे, अशी दर्पोक्ती करण्यात आली. या बैठकीत काय झाले याची माहिती देण्यात आली नसली तरी स्थितीचा आढावा घेण्यात आल्याचे समजते.

जगभरातून निषेध

पेहलगाम येथे इस्लामी दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर हल्ल्याचा निषेध जगभरातून होत आहे. अमेरिका, ब्रिटन, फ्रान्स, जर्मनी आणि इतर देशांच्या प्रशासनांनी या हल्ल्याची निंदा केली असून भारताच्या पाठीशी उभे असल्याचे स्पष्ट केले आहे. जगातील अनेक मानवाधिकार संघटना आणि सामाजिक संघटनांनीही या हल्ल्याचा निषेध केला आहे. दहशतवादाला या जगात स्थान मिळता कामा नये, अशी भावना अनेक देशांच्या मान्यवर नेत्यांनी या हल्ल्याच्या संदर्भात व्यक्त केली आहे.

मृतांची संख्या 28

  • पेहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यातील मृतांची संख्या 28
  • जन्मभर दहशतवाद्यांच्या लक्षात राहील असा प्रतिशोध घेण्याचा देशाचा निर्धार
  • जगभरातून हल्ल्याचा तीव्र निषेध, जागतिक नेत्यांकडून भारताला सहानुभूती

Comments are closed.