राज्यात मुसळधार कोसळणार; हवामान खात्याचा इशारा

देशात आणि राज्यात वेळेपुर्वीच दाखल झालेल्या मॉन्सूनने जून महिन्यात काही काळ उसंत घेतली होती. मात्र, आता जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच मॉन्सूनने पुन्हा एकदा दमदार बॅटिंगला सुरुवात केली आहे. येत्या आठवड्यात राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसासाह वादळी वारे वाहण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान खात्याच्या अंदाजनुसार जुलै आणि ऑगस्ट महिन्यात जास्त पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याने राज्यातील अनेक भागांमध्ये अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पुढील 24 तासांमध्ये कोकणात अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गा या जिल्ह्यांना हाय अलर्ट देण्यात आला आहे. तसेच या काळात राज्यात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यांचा वेग प्रति तास 45 ते 55 किमी असण्याचा अंदाज आहे.

हवामान खात्याने मराठवाड्यालाही पावसाचा इशारा दिला आहे. मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. विदर्भातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे, विदर्भात पुढील काही तासांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता असून, भंडारा, गोंदिया आणि नागपूर या जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातही जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे.

Comments are closed.