आज ब्रिक्स शिखर परिषदेत आपले स्वागत आहे
भारत यजमान : पुतीन-जिनपिंग यांची मुख्य उपस्थिती : 11 सदस्य देशांच्या नेत्यांचाही सहभाग
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत 12-13 सप्टेंबर रोजी दिल्लीत 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्यासह 11 सदस्य देशांचे नेते उपस्थित राहणार आहेत. या शिखर परिषदेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. पश्चिम आशियातील संघर्ष अजूनही सुरू असल्याने भारत या ब्रिक्स शिखर परिषदेच्या माध्यमातून जगाला एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न करणार आहे.
भारताची राजधानी दिल्लीत होणाऱ्या 18 व्या ब्रिक्स शिखर परिषदेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचे शुक्रवारी पहाटेच भारतात आगमन झाले असून पंतप्रधान मोदींनी त्यांच्यासोबत द्विपक्षीय चर्चाही पूर्ण केली आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग आणि इराणचे अध्यक्ष मसूद पेझेश्कियान हेदेखील ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी होत आहेत. या शिखर परिषदेत इराण, संयुक्त अरब अमिरात आणि सौदी अरेबिया यांचे प्रतिनिधित्व पश्चिम आशियाई दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण ठरू शकते. नुकत्याच झालेल्या एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी रशियाचे अध्यक्ष पुतीन यांना जगाने अंतहीन युद्धाकडून युद्धाच्या समाप्तीकडे वाटचाल केली पाहिजे, असा संदेश दिला होता. हाच मुद्दा ब्रिक्सच्या मंचावरही उपस्थित होण्याची शक्यता आहे. दरम्यान, ब्रिक्स शिखर परिषदेदरम्यान रशिया आणि चीनसोबतचे भारताचे द्विपक्षीय संबंधही अधिक दृढ होऊ शकतात.
पश्चिम आशियाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाची परिषद
पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर सध्याची ब्रिक्स शिखर परिषद होत असून, त्यात इराण, सौदी अरेबिया आणि संयुक्त अरब अमिराती सहभागी आहेत. दरम्यान, रशिया-युक्रेन युद्ध टाळण्यासाठी आणि शांततेच्या प्रयत्नांना चालना देण्यासाठी एकाचवेळी दोन्ही देशांशी संवाद साधू शकणाऱ्या काही मोजक्या देशांपैकी भारत एक आहे. एससीओ शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी युद्धाविरोधात दिलेला संदेश जागतिक स्तरावर बराच चर्चेत आहे.
भारताकडून चारवेळा आयोजन
भारताने 2012 मध्ये पहिल्यांदा ब्रिक्स परिषदेचे आयोजन केले होते. मोदी सरकारच्या कार्यकाळात भारतात ब्रिक्स शिखर परिषद आयोजित होण्याची ही तिसरी वेळ आहे. भारताने 2016 आणि 2021 च्या आवृत्त्यांचेही आयोजन केले होते. 2021 च्या कोविड-19 संकटानंतर आता जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत 2026 मध्ये पुन्हा एकदा नेतृत्व करत आहे. ‘भारत मंडपम’मध्ये होणाऱ्या 2026 च्या शिखर परिषदेसाठी दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी 25,000 हून अधिक पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. 100 हून अधिक एनएसजी कमांडो आणि ड्रोनविरोधी यंत्रणा सुसज्ज आहे. विमानविरोधी तोफा, स्नायपर आणि घातपातविरोधी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. तसेच महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीसाठीही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.
Comments are closed.