ममता बॅनर्जी की BJP? बंगालमध्ये धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता, ओपिनियन पोलची आकडेवारी समोर

कोलकाता: आगामी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून, यंदा सत्ताधारी ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या टीएमसी (All India Trinamool Congress TMC) आणि भाजप (Bharatiya Janata Party BJP) यांच्यात अत्यंत चुरशीची लढत होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. MATRIZE या संस्थेच्या ओपिनियन पोलनं राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

या सर्वेनुसार TMC ला 43 टक्के, तर BJP ला 42 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतर पक्षांना 16 टक्के मतं मिळू शकतात. या आकडेवारीवरून यंदाची निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार असल्याचं स्पष्ट होतंय.

West Bengal Seat Prediction : बहुमतासाठी धावपळ

294 जागांच्या पश्चिम बंगाल विधानसभेत बहुमतासाठी 148 जागांची आवश्यकता आहे. MATRIZE च्या अंदाजानुसार, TMC ला 140 ते 160 जागा, तर BJP ला 130 ते 150 जागा मिळू शकतात. इतर पक्षांना 8 ते 16 जागा मिळण्याचा अंदाज आहे. या अंदाजामुळे सत्ता कोणाच्या हाती जाणार, याबाबत अजूनही अनिश्चितता कायम आहे.

West Bengal Political Equation : नव्या समीकरणांनी रंगत वाढली

यंदाच्या निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये नवीन राजकीय समीकरणेही चर्चेत आली आहेत. TMC मधून बाहेर पडलेले हुमायूं कबीर यांनी ‘आम जनता उन्नयन पार्टी’ स्थापन केली असून त्यांनी असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या एआयएमआयएम (All India Majlis-e-Ittehadul Muslimeen AIMIM) सोबत युती केली आहे. या आघाडीमुळे काही मुस्लिम बहुल मतदारसंघांमध्ये TMC ला फटका बसण्याची शक्यता असून त्याचा अप्रत्यक्ष फायदा BJP ला होऊ शकतो असं म्हटलं जात आहे.

West Bengal Election Schedule : निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यात निवडणूक होत असून पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना 30 मार्च 2026 रोजी, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 2 एप्रिल 2026 रोजी जाहीर झाली आहे. पहिल्या टप्प्याचे अर्ज भरण्याची अंतिम तारीख 6 एप्रिल, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 9 एप्रिल निश्चित करण्यात आली आहे. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करून 6 मे 2026 पर्यंत संपूर्ण निवडणूक प्रक्रिया संपवली जाणार आहे.

West Bengal Voter Data : तरुण मतदार ठरवणार निकाल

निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये एकूण 6.44 कोटी मतदार आहेत. यामध्ये 3.28 कोटी पुरुष, 3.16 कोटी महिला आणि 1152 तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. 18 ते 19 वयोगटातील 5.23 लाख तरुण मतदार प्रथमच मतदान करणार आहेत. 20 ते 29 वयोगटातील 1.31 कोटी मतदार निर्णायक भूमिका बजावू शकतात.

West Bengal Previous Result : 2021 मध्ये TMC ची एकहाती सत्ता

या आधीच्या 2021 च्या विधानसभा निवडणुकीत ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखाली TMC ने 294 पैकी 215 जागा जिंकत तब्बल 48 टक्के मतांसह एकहाती सत्ता मिळवली होती. मात्र यंदा परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत असून भाजपकडून टीएमसीसमोर कडवं आव्हान निर्माण करण्यात आलं आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.