ममता बॅनर्जी सरकार बरखास्त; राज्यपालांचा निर्णय, बंगालमध्ये भाजप सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा
ममता बॅनर्जी सरकार बरखास्त : पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठी घडामोड घडली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर राज्यपालांनी ममता बॅनर्जी यांच्या मंत्रिमंडळाला बरखास्त केलं आहे. विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचा मोठा पराभव झाल्यानंतरही ममता बॅनर्जी यांनी सत्ता सोडण्यास नकार दिला होता. त्यानंतर राज्यपालांनी संवैधानिक अधिकारांचा वापर करत हा मोठा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे.
तृणमूल काँग्रेस प्रमुख ममता बॅनर्जी यांनी निवडणुकीचा निकाल हा जनादेश नसून कटकारस्थान असल्याचा आरोप केला होता. “आमचा पराभव जनतेमुळे नाही, तर निवडणूक प्रक्रियेत झालेल्या गैरप्रकारांमुळे झाला आहे,” असा दावा त्यांनी केला होता.
West Bengal Political Crisis : ममता बॅनर्जींचा निवडणूक आयोगावर आरोप
ममता बॅनर्जी यांनी भाजपपेक्षा निवडणूक आयोगाविरोधातच आमची लढाई होती, असा गंभीर आरोप केला होता. “जवळपास 100 जागांवर जनादेश लुटण्यात आला. मतमोजणी जाणीवपूर्वक संथ करण्यात आली. आम्हाला हरवण्यासाठी संपूर्ण यंत्रणा वापरण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.
आपण हरलेलो नाही, त्यामुळे लोकभवनात जाऊन राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही असं म्हणत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार नसल्याचं ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं.
BJP Government Bengal : भाजपच्या पहिल्या सरकारची तयारी
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या पहिल्या सरकारच्या शपथविधीची तयारी सुरू झाली आहे. 9 मे रोजी कोलकात्यातील ब्रिगेड परेड ग्राउंड येथे शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात केली जाणार आहे.
या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि भाजपशासित राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Mamata Banerjee Reaction : आता मी मुक्त, ममता बॅनर्जींची प्रतिक्रिया
पराभवानंतर ममता बॅनर्जी यांनी राष्ट्रीय स्तरावर इंडिया आघाडी मजबूत करण्यावर भर देणार असल्याचं सांगितलं होतं. सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इंडिया आघाडीतील इतर नेत्यांनी मला पाठिंबा दर्शवला आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. मी आता एक सामान्य नागरिक आहे. मी रस्त्यावर उतरून लढणार. अन्यायाविरोधात संघर्ष सुरू ठेवणार, असंही ममता बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं होतं.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.