'पश्चिम बंगाल' होणार 'पश्चिम बँग'
मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांची घोषणा : येत्या विधिमंडळ अधिवेशनात नामांतराचा प्रस्ताव मांडणार
► वृत्तसंस्था/ कोलकाता
पश्चिम बंगालचे नाव बदलण्याची तयारी राज्य सरकारने सुरू केली आहे. राज्याचे नाव बदलून ‘पश्चिम बंग’ करण्याचा प्रस्ताव विधानसभेत सादर केला जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी सोमवारी केली. विधिमंडळातील चर्चेसाठी 9 डिसेंबर ही तारीख निश्चित करण्यात आली आहे. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
पश्चिम बंगालच्या नामांतरासंबंधीचा प्रस्ताव 9 डिसेंबर रोजी विधानसभेत सादर केला जाईल. विधानसभेकडून मंजुरी मिळाल्यानंतर तो केंद्र सरकारकडे पाठवला जाईल. यानंतर नाव बदलण्याची घटनात्मक प्रक्रिया पुढे जाईल, असे सांगण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या म्हणण्यानुसार राज्याचे नाव इंग्रजीमध्येही ‘झ्asम्प्ग्स् ँaहु’ असेच राहील.
4 ते 14 डिसेंबरला हिवाळी अधिवेशन
पश्चिम बंगाल विधानसभेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबर रोजी सुरू होऊन 14 डिसेंबरपर्यंत चालेल. या अधिवेशनादरम्यान, 9 डिसेंबर रोजी राज्याचे नाव बदलण्याचा प्रस्ताव सभागृहात मांडला जाईल. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केली. यापूर्वी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनीही राज्याचे नाव बदलण्याचे संकेत दिले होते. सरकार लवकरच राज्याच्या नामांतरासंबंधी विधानसभेत एक प्रस्ताव मांडेल, असे त्यांनी म्हटले होते. आता, मुख्यमंत्र्यांच्या घोषणेमुळे नाव बदलण्याची योजना स्पष्ट झाली आहे.
यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्याकडूनही प्रयत्न
पश्चिम बंगालचे नाव बदलण्याचा मुद्दा नवीन नाही. यापूर्वी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस सरकारनेही राज्याचे नाव बदलण्याचा प्रयत्न केला होता. 2016 मध्ये राज्य सरकारने वेगवेगळ्या भाषांसाठी तीन नावांचा प्रस्ताव ठेवला होता. त्यानंतर, 2018 मध्ये विधानसभेने राज्याचे नाव सर्व भाषांमध्ये बदलून ‘बांगला’ करण्याचा प्रस्ताव मंजूर केला. तथापि, केंद्र सरकारकडून मंजुरी न मिळाल्याने हा बदल लागू होऊ शकला नाही. यापूर्वी, 1999 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या सरकारनेही राज्याचे नाव बदलून ‘पश्चिम बंग’ करण्याचा प्रस्ताव ठेवला होता, परंतु तोही पुढे सरकला नव्हता.
नाव बदलण्याची मागणी का?
पश्चिम बंगालचे इंग्रजी नाव ‘वेस्ट बंगाल’ असे आहे. इंग्रजी वर्णमालेत ‘sं’ हे अक्षर सर्वात शेवटी येते. यामुळेच सरकारी आणि प्रशासकीय बैठकांमध्ये वर्णानुक्रमे यादीत राज्याचे नाव सर्वात शेवटी येते. राज्याच्या नावाबाबतचा हा मुद्दा यापूर्वीही उपस्थित करण्यात आला आहे. आता, सुवेंदू अधिकारी सरकारने नाव बदलून ‘पश्चिम बंग’ करण्याच्या दिशेने पाऊल उचलले आहे. तथापि, मंत्रिमंडळाची मंजुरी आणि विधानसभेत ठराव मंजूर झाल्यानंतरही नाव आपोआप बदलणार नाही. केंद्र सरकार आणि संसदेची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. तथापि, राज्यात आणि केंद्रात भाजपप्रणित रालोआची सत्ता असल्याने नामांतराचा प्रस्ताव सहजगत्या मंजूर होऊ शकतो, असे मानले जात आहे.
Comments are closed.