पश्चिम बंगालची मतदार यादी जाहीर
संशयास्पद मतदारांच्या छाननीनंतर पुरवणी येणार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पश्चिम बंगालच्या मतदारांची अंतिम सूची केंद्रीय निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे. या मतदारसूचीतून 58 लाख नावे वगळण्यात आली आहेत. आणखी जवळपास 1 कोटी नावे संशयास्पद आहेत. आयोगाकडून त्यांची छाननी केली जात आहे. ही छाननी झाल्यानंतर पुरवणी मतदारसूची प्रसिद्ध करण्याची अनुमती आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने दिली आहे. त्यामुळे पूर्णत: अंतिम सूची आणखी काही दिवसांनी छाननीचे काम पूर्ण झाल्यावर प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे.
या सूचीनंतर आता पश्चिम बंगाल राज्यात एकंदर 7 कोटी 66 लाख 37 हजार 529 मतदारांपैकी 7 कोटी 4 लाख 59 हजार 284 मतदार अंतिम सूचीत उरले आहेत. 16 डिसेंबर 2026 या दिवशी आयोगाने अस्थायी मतदारसूची प्रसिद्ध केली होती. अंतिम सूचीत या सूचीपेक्षा 1 लाख 82 हजार 36 नावे अधिक आहेत. ती नंतर समाविष्ट करण्यात आली आहेत. तसेच फॉर्म 8 अनुसार 6 हजार 671 नावे अधिक समाविष्ट करण्यात आली आहेत.
छाननीचे काम अद्यापही
पश्चिम ब् ांगाल मतदारसूची पुनर्सर्वेक्षणाचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहचले आहे. या मतदारसूचीत जवळपास एक कोटीहून अधिक नावे, अद्यापही संशयास्पद आहेत. या नावांची छाननी केली जात आहे. छाननी करण्यासाठी आजी आणि माजी जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती केली जावी, असा आदेश दिला आहे. त्यानुसार कलकत्ता उच्च न्यायालयाने 250 आजी-माजी न्यायाधीशांची नियुक्ती केली आहे. मात्र, तेव्हढे बळ पुरेसे नसल्याने ओडीशा आणि झारखंड येथूनही आजी-माजी न्यायाधीश बोलाविण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे ही छाननी होत जाईल, त्यानुसार टप्प्याटप्प्याने पुरवणी मतदारसूची प्रसिद्ध केल्या जाणार आहेत. त्यामुळे ही प्रक्रिया आणखी आठ ते दहा दिवस चालण्याची शक्यता आहे.
मतदारसूचीत अनेक विसंगती
पश्चिम बंगालच्या मतदारसूचीत अनेक विसंगती केंद्रीय निवडणूक आयोगाला आढळून आल्या आहेत. बापाच्या आणि मुलाच्या वयात केवळ 15 वर्षांचे अंतर असणे, एका व्यक्तीला 200 किंवा 300 मुले असणे, आजोबाच्या आणि नातवाच्या वयामध्ये केवळ 20 ते 25 वर्षांचे अंतर असणे, अनेक मतदारांची नावे समसमान असणे, अशा अनेक तार्किक त्रुटी आहेत. अशा संशयास्पद मतदारांची संख्या अनेक दशलक्षांच्या घरात आहे. त्यामुळे सखोल छाननी केली जात आहे.
Comments are closed.