टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपनंतर वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका संघ मायदेशी रवाना
दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडीज संघातील उर्वरित खेळाडू आणि सपोर्ट स्टाफचे पथक अखेर सुरक्षितपणे मायदेशी रवाना झाल्याची माहिती ‘आयसीसी’ने दिली. टी-20 वर्ल्ड कपच्या समाप्तीनंतरही इस्रायल-इराण दरम्यानच्या युद्धामुळे हिंदुस्थानातच अडकून पडले होते. गेल्या 24 तासांत दक्षिण आफ्रिका संघाच्या उर्वरित 29 सदस्यांचा तसेच वेस्ट इंडीजच्या अंतिम 16 सदस्यांना मायदेशी पाठविण्यात आले आहे. त्यामुळे या स्पर्धेनंतरची सर्व प्रवासी व्यवस्था पूर्ण झाल्याचे आयसीसीने स्पष्ट केले. जागतिक स्तरावरील बदलत्या प्रवास परिस्थितीमुळे ही प्रक्रिया आव्हानात्मक ठरली होती. या काळात आयसीसीच्या ऑपरेशन्स आणि लॉजिस्टिक्स पथकाने विविध सरकारे, विमान पंपन्या, चार्टर सेवा, विमानतळ प्राधिकरणे आणि सदस्य क्रिकेट मंडळांसोबत समन्वय साधत ही व्यवस्था सुरळीत पार पाडली. उर्वरित सर्व खेळाडू, अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबीयांना सुरक्षितपणे मायदेशी पोहोचवणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे आयसीसीने नमूद केले.
Comments are closed.