कॅरेबियन संघानं रचला इतिहास! 34 वर्षांनंतर वेस्ट इंडिजने पाकिस्तानला वनडे मालिकेत हरवलं

वेस्ट इंडिज विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील अखेरचा सामना मंगळवारी, 12 ऑगस्ट रोजी त्रिनिदाद येथे खेळला गेला. या सामन्यात पाकिस्तान संघाला तब्बल 202 धावांच्या फरकाने पराभवाचा सामना करावा लागला. या लढतीत ना बाबर आझम चालला, ना कर्णधार मोहम्मद रिझवान, ना अब्दुल्ला शफिक, तर सैम अय्यूबही अपयशी ठरला. पाकिस्तानचा संपूर्ण संघ केवळ 92 धावांवर गारद झाला, मोठ्या फरकाने हरत 2-1 अशा फरकाने मालिका गमावली.

पाकिस्तानला वेस्ट इंडिजविरुद्ध द्विपक्षीय मालिकेत शेवटचा पराभव 1991 मध्ये झाला होता. त्यानंतर आता 2025 मध्ये वेस्ट इंडिजने पाकिस्तानला वनडे मालिकेत पराभूत केले. या सामन्यात कॅरिबियन संघाने निर्धारित 50 षटकांत 6 गडी गमावून 294 धावा केल्या. कर्णधार शाई होपने 94 चेंडूत 10 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 120 धावा ठोकल्या. त्याचा स्ट्राइक रेट 127.66 होता. जस्टिन ग्रिव्ह्जने 24 चेंडूत 43 धावा, तर इव्हिन लुईस आणि रोस्टन चेस यांनी प्रत्येकी 37 धावा केल्या.

प्रत्युत्तरात, 295 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तान संघ पत्त्यांसारखा कोसळला. पहिला गडी शून्यावर, दुसरा 8 धावांवर, तिसराही 8 धावांवर आणि चौथा 23 धावांवर बाद झाला. टॉप 4 मधील सैम अय्यूब, अब्दुल्ला शफिक आणि मोहम्मद रिझवान खातेही न उघडता माघारी परतले. बाबर आझमने 23 चेंडूत फक्त 9 धावा केल्या. पाकिस्तानच्या 5 फलंदाजांचे खाते उघडलेच नाही, तर संपूर्ण संघ 29.2 षटकांत 92 धावांवर गारद झाला. अशा रीतीने वेस्ट इंडिजने मालिका 2-1 ने जिंकली. विशेष म्हणजे, मालिकेतील पहिला सामना पाकिस्तानने जिंकला होता, मात्र पुढील दोन सामने यजमान कॅरिबियन संघाने जिंकून मालिका आपल्या नावे केली.

Comments are closed.