वेस्ट इंडीज बोर्डाने लावला पूर्ण जोर; पण निकोलस पूरनने निवृत्तीतून परतण्याच्या प्रस्तावावर म्हटले…
टी20 वर्ल्ड कप 2026 पूर्वी क्रिकेट वेस्ट इंडिजला आपल्या एका खेळाडूकडून मोठा धक्का बसला आहे. स्टार खेळाडू निकोलस पूरनने गेल्या वर्षी अत्यंत कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले होते. बोर्डाची इच्छा होती की त्यांच्या या धडाकेबाज खेळाडूने आपली निवृत्ती मागे घ्यावी आणि देशासाठी टी20 वर्ल्ड कप खेळावा, परंतु पूरनने ही मागणी फेटाळून लावली आहे.
क्रिकेट वेस्ट इंडिजचे क्रिकेट संचालक माइल्स बासकोम्बे यांनी निकोलस पूरनशी संपर्क साधल्याची कबुली दिली आहे. टी20 वर्ल्ड कप 2026 मध्ये संघाने पूर्ण ताकदीनिशी उतरावे अशी बोर्डाची योजना होती. माइल्स म्हणाले, “टूर्नामेंटमध्ये वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व सर्वोत्तम खेळाडूंनी करावे, यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले. आम्ही त्याच्या पुनरागमनाच्या शक्यतेवरही चर्चा केली, पण निकोलस आपल्या निर्णयावर ठाम राहिला.” त्यांनी पुढे असेही सांगितले की, टी20 वर्ल्ड कप 2026 डोळ्यासमोर ठेवूनच पूरनने निवृत्तीचा निर्णय घेतला होता.
पूरन हा टी20 क्रिकेटमधील सर्वात घातक फलंदाजांपैकी एक मानला जातो, जो मैदानात येताच मोठे फटके मारण्यात माहीर आहे. त्याची क्षेत्ररक्षण करण्याची पद्धत लाजवाब आहे आणि यष्टीरक्षक म्हणूनही त्याने सर्वांना प्रभावित केले आहे. थोडक्यात सांगायचे तर तो एक ‘कम्प्लीट पॅकेज’ आहे, परंतु त्याने खूप कमी वयात निवृत्ती स्वीकारली. अनेक खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय प्रवास वयाच्या 30 व्या वर्षाच्या आसपास सुरू होतो, ज्यामध्ये भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवचाही समावेश आहे. मात्र, पूरनने वयाच्या अवघ्या 29 व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले.
टी20 वर्ल्ड कप 2026 भारत आणि श्रीलंका या देशांमध्ये खेळवला जाणार आहे. वेस्ट इंडिजचा संघ ग्रुप सी मध्ये असून या गटातील सर्व सामने भारतात होणार आहेत. पूरनने आयपीएलमध्ये (IPL) भरपूर क्रिकेट खेळले आहे आणि तो आजही खेळत आहे, त्यामुळे त्याला येथील खेळपट्ट्यांची चांगली माहिती आहे. मात्र, त्याच्या या अनुभवाचा फायदा तो आपल्या राष्ट्रीय संघाला मिळवून देऊ शकणार नाही.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला पूरन सध्या जगभरातील टी20 लीगमध्ये खेळत आहे. त्याचा फॉर्म पाहता बोर्डाला तो संघात हवा होता, परंतु त्याने बोर्डाचा प्रस्ताव नाकारला. जेव्हा बोर्डाने पुनरागमनाबाबत चर्चा केली, तेव्हा पूरनने स्पष्ट केले की, टी20 वर्ल्ड कपचा विचार करूनच त्याने निवृत्ती घेतली होती, त्यामुळे आता परत येण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
वेस्ट इंडिज क्रिकेटने अद्याप टी20 वर्ल्ड कप 2026 साठी आपला संघ जाहीर केलेला नाही. अफगाणिस्तानविरुद्धच्या टी20 मालिकेनंतर बोर्ड आपल्या अंतिम योजनांना मूर्त स्वरूप देण्याची शक्यता आहे.
Comments are closed.