IND Vs WI – मालिका दणक्यात जिंकली!

>> संजय करहाडे

काल शतकवीर कॅम्पबेल-होप यांनी लक्ष्मण-द्रविडने कोलकात्यात पंचवीस वर्षांपूर्वी दाखवलेली करामत दाखवली नाही आणि माझ्या शंका-कुशंकांना तिलांजली मिळाली हे बरं झालं. कप्तान चेसनंतर ग्रीव्हज आणि सील्स जोडीने छान भागीदारी केली, पण मधल्या फळीतला कुणी विंडीजचा लाल खेळपट्टीवर उभाच राहिला नाही. एकशे एकवीस धावांचं साधारणसं आव्हान पार करायला आता फक्त अठ्ठावन्न धावा हव्यात. थोडक्यात, आज मालिकेतला विजय नक्की!

शुभमनची कसोटी कारकीर्द खूप मस्त आकार घेतेय. सात कसोटींत चार विजय. इंग्लंडमध्ये इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत बरोबरी आणि विंडीजविरुद्धची घरची मालिका 2-0 खिशात! यादरम्यान पाच शतकं आणि एकूण तब्बल 933 धावा. व्वा, भल्या-थोरांना हेवाच वाटावा!

कसोटीतल्या यशाचं श्रेय गौतम गंभीरलाही द्यावंच लागेल आणि नेहमी पडद्यामागे राहणाऱ्या सीतांशू कोटकलासुद्धा. या संघातले बहुतांश फलंदाज राहुल द्रविडच्या मुशीत तयार झालेत हे जरी खरं असलं तरी द्रविडने घातलेली वीण सीतांशूने कायम ठेवलेली आहे.

मात्र, शुभमनला अजून बरीच मजल मारायची आहे. सर्वात आधी ऑस्ट्रेलियाची परीक्षा. तीन वन डेसाठी रो-कोचं पुनरागमन, संबंधित विवाद. त्यात वन डेसाठी संघात बुमरा नाहीये. मात्र, पाच टी-20 साठी त्याचा संघात समावेश आहे. म्हणजे अगदी आमिर खुसरोच्या गीतासारखी ‘कठिन डगर पनघट की, कैसे मै भर लाऊँ मधवा से मटकी’ अशी दुष्कर परिस्थिती नसली तरी गौतम आणि गिलला काही जटिल अन् अनुत्तरित प्रश्नांचा निकाल लावावाच लागेल.

यानंतर त्यांच्या संघाची कसोटी दक्षिण आफ्रिकेसमोर लागणार आहे. दोन कसोटींची ही मालिका पुन्हा हिंदुस्थानातच होणार आहे, पण दक्षिण आफ्रिकेचा संघ विंडीजसारखा लेचापेचा नसेल. हल्लीच त्यांनी जागतिक कसोटी स्पर्धेचं विजेतेपद ऑस्ट्रेलियाला हरवून पटकावलंय. त्यांच्यावर लागलेला ‘चोकर्स’चा ठप्पा त्यांनी पुसून काढलेला आहे अन् आज ते पाकविरुद्ध दोन कसोटींची मालिका खेळत आहेत. म्हणजे आपल्या घरच्यासारख्याच खेळपट्टय़ांवर चांगला सराव करून ते नोव्हेंबरमध्ये येत आहेत. दोन कसोटींशिवाय ते तीन वन डे आणि पाच टी-20सुद्धा खेळणार आहेत. या आणि पुढच्या सर्व परीक्षा आपला संघ पास करील आणि आपण क्रिकेटप्रेमी सदैव आनंदी राहू अशी आशा!

Comments are closed.