ऐकावं ते नवल…वेस्ट इंडिजच्या नावावर अनोखा विक्रम, बांगलादेश विरुद्ध 300 बॉल फिरकीपटूंनी टाकले


ढाका: वेस्ट इंडिजनं क्रिकेटमध्ये नव्या इतिहासाची नोंद केली आहे. वनडे मॅचमध्ये संपूर्ण 50 ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करण्याचा विक्रम वेस्ट इंडिजनं केली आहे. क्रिकेट इतिहासात अशी कामगिरी करणारी वेस्ट इंडिज पहिली टीम ठरली आहे. वेस्ट इंडिजनं बांगलादेश विरुद्ध दुसऱ्या वनडेत सर्व ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करुन घेतल्या. एकेकाळी भेदक आणि वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या वेस्ट इंडिजच्या संघानं आज 50 ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करुन घेतल्या आहेत. बांगलादेशनं फिरकीपटूंसमोर 213 धावा केल्या.

वेस्ट इंडिजच्या संघातील अकील हुसेन, रॉस्टन चेज, खैरी पिएर, गुडाकेश मोती आणि एलिक अथनाजे यांनी  10-10 ओव्हर टाकल्या. पुरुष क्रिकेट इतिहासातील ही पहिली घटना आहे.   वेस्ट इंडिजनं अष्टपैलू खेळाडू जस्टिन ग्रीव्जला संघात वेगवान गोलंदाज म्हणून घेतलं होतं. मात्र, कॅप्टन शाई होप यानं त्याला एकही ओव्हर दिली नाही. एलिक अथानाजे वनडे मॅचमध्ये 10 ओव्हर गोलंदाजी करत नाही. मात्र, यावेळी त्यानं  10 ओव्हर गोलंदाजी केली आणि 14 धावा देत 2 विकेट घेतल्या. गुडाकेश मोती यानं 10 ओव्हरमध्ये 65 धावा देत तीन विकेट घेतल्या.

वेस्ट इंडिज आणि बांगलादेश यांच्यात पहिली वनडे ज्या मैदानात झाली होती त्याच मैदानात दुसरी मॅच होत आहे. त्या मॅचमध्ये रिशाद हुसैन यानं  6 विकेट घेतल्या होत्या. बागंलादेशनं वेस्ट इंडिजला 74 धावांनी पराभूत केलं होतं. त्यामुळं वेस्ट इंडिजनं फिरकीपटूंना दुसऱ्या वनडेत संघात स्थान दिलं याशिवाय  50 ओव्हर गोलंदाजी देखील त्यांच्याकडून करुन घेतली.

श्रीलंकेचा विक्रम मोडला

एखाद्या वनडे मॅचमध्ये फिरकीपटूंकडून सर्वाधिक ओव्हर गोलंदाजी करुन घेण्याचा विक्रम श्रीलंकेच्या नावावर होता. 1996 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजांनी 44 ओव्हर गोलंदाजी केली होती. या यादीत पहिल्या  9 स्थानांवर  8 वेळा श्रीलंका आहे. श्रीलंकेनं अनेकदा 40 पेक्षा अधिक ओव्हर फिरकीपटूंनी केल्या आहेत. भारतानं 2011 मध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध 41.2 ओव्हर फिरकीपटूंकडून पूर्ण करुन घेतल्या होत्या.

हेदेखील वाचा

आणखी वाचा

Comments are closed.