एक वादळ शांत झालं, विंडीज गोलंदाज बर्नार्ड ज्युलियन यांचे निधन

क्रिकेटच्या रोमांचक इतिहासात काही खेळाडू आकडेवारीने नव्हे, तर त्यांच्या सहजशैलीनं, त्यांच्या अस्तित्वानं ठसा उमटवून जातात. वेस्ट इंडीजचे बर्नार्ड ज्युलियन त्यापैकीच एक. त्रिनिदाद-टोबॅगोच्या वॉल्सन शहरात 75व्या वर्षी या वेगवान अष्टपैलूने अखेरचा श्वास घेतला आणि विंडीज क्रिकेटचं एक सुवर्णपान गळालं.

वेस्ट इंडीज क्रिकेट बोर्डानं त्याला श्रद्धांजली अर्पण करताना म्हटलं – बर्नार्ड फक्त खेळाडू नव्हता, तो वेस्ट इंडीज क्रिकेटच्या आत्म्याचा प्रतिनिधी होता. खरंच, एकाच व्यक्तीमध्ये बॉलची सळसळ आणि बॅटची संयत धडधड यांचं दुर्मिळ मिश्रण होतं.

क्रिकेटचा पहिला वनडे वर्ल्ड कप

लॉर्डस्च्या बाल्कनीत क्लाईव्ह लॉईड ट्रॉफी उचलताना ज्या संघाने इतिहास लिहिला, त्या संघात ज्युलियन होता. त्याच्या डाव्या हाताच्या स्विंगने प्रतिस्पर्ध्यांची अक्षरशः कंबर मोडली. श्रीलंकेविरुद्ध 20 धावांत 4 विकेट, न्यूझीलंडविरुद्ध 27 धावांत 4 विकेट आणि लॉर्ड्सच्या अंतिम सामन्यात 38 धावांत 2 विकेट. तसेच नाबाद 26 धावा करून त्याने संघाच्या जगज्जेतेपदावर मोहोर लावली. त्या काळी विंडीजचे क्रिकेट म्हणजे जोशाचा लाव्हा आणि ज्युलियन त्या लाह्यातला शांत, पण घातक ज्वालकण.

कसोटी क्रिकेटमध्ये 24 सामने, 866 धावा आणि 50 बळीष्ठ आकडे साधेसे वाटतील, पण या आकडय़ांमध्ये असंख्य टप्पे वाचता येतात. मैदानावर वेगवान गोलंदाजांचा तडाखा सहन करत तो डाव स्थिर करायचा आणि दुसऱया इनिंगला स्विंगने प्रतिस्पर्ध्यांची दांडी गूल करायचा.

वादळानं गिळलेली कारकीर्द

1982-83 मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या दौऱयावर गेलेल्या ‘रिबेल टूर’मध्ये सहभागी झाल्यामुळे ज्युलियनचा आंतरराष्ट्रीय प्रवास अचानक थांबला आणि संपलो. तो काळ रंगभेदविरोधी चळवळीचा होता. नैतिकता आणि खेळ यांच्यातील संघर्षानं ज्युलियनसारखा खेळाडू क्रिकेटच्या मुख्य प्रवाहातून बाहेर फेकला गेला.

Comments are closed.