जसप्रीत बुमराहसमोर वेस्ट इंडीजचा ‘सुपरस्टार’ हतबल; 23 चेंडूत 6 वेळा केलाय पराभव!

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात खेळल्या जाणाऱ्या सामन्यात पुन्हा एकदा फलंदाजांची जादू पाहायला मिळाली. नाणेफेक हारल्यानंतर वेस्ट इंडीजचा संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्यांच्या फलंदाजांनी चमकदार कामगिरी करत २० षटकांत ४ गडी गमावून १९५ धावांचा डोंगर उभा केला. या सामन्यात वेस्ट इंडीजचा संघ एका क्षणी याहूनही मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता, मात्र त्याच वेळी जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडीजच्या ‘सुपरस्टार’ फलंदाजाला तंबूत धाडून सामन्याचे चित्र पालटले.

​आयसीसी टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये वेस्ट इंडीजसाठी शिमरॉन हेटमायरने सर्वाधिक धावा केल्या आहेत. भारताविरुद्धच्या सामन्यातही हेटमायर चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता. त्याने १२ चेंडूंत १ चौकार आणि २ षटकार ठोकून २७ धावा केल्या होत्या. अशा वेळी जेव्हा वेस्ट इंडीजचा संघ मोठ्या धावसंख्येकडे सरकत होता, तेव्हा कर्णधार सूर्यकुमार यादवने जसप्रीत बुमराहला गोलंदाजीसाठी पाचारण केले. बुमराहने आपल्या कर्णधाराला निराश न करता हेटमायरला बाद करून माघारी धाडले. टी-२० फॉरमॅटमध्ये शिमरॉन हेटमायरचा बुमराहविरुद्धचा विक्रम अत्यंत खराब आहे. बुमराहने या फॉरमॅटमध्ये त्याला केवळ २३ चेंडू टाकले असून तब्बल ६ वेळा बाद केले आहे. या दरम्यान हेटमायरला केवळ १७ धावाच करता आल्या. बुमराहने याच षटकात रोस्टन चेसलाही बाद केले.

​वेस्ट इंडीजच्या संघाला या सामन्यात संथ सुरुवात मिळाली, परंतु त्यांनी जास्त गडी गमावले नाहीत. याचा फायदा त्यांना शेवटच्या षटकांमध्ये झाला. रोवमॅन पॉवेलने नाबाद ३४ धावा केल्या, तर जेसन होल्डरने नाबाद ३७ धावांचे योगदान दिले. त्यांच्या या खेळीमुळेच वेस्ट इंडीजचा संघ २० षटकांत १९५ धावांपर्यंत मजल मारू शकला. टीम इंडियासाठी जसप्रीत बुमराहने २ बळी घेतले, तर हार्दिक पांड्या आणि वरुण चक्रवर्ती यांना प्रत्येकी १-१ बळी मिळाला. आता विजयाची सर्व जबाबदारी भारतीय फलंदाजांच्या खांद्यावर आहे.

Comments are closed.