ICC T20 World Cup – अखेर सुटले! अडकून पडलेल्या ‘विंडिज’ संघाचा जीव भांड्यात, मायदेशी परतण्यासाठी चार्टर्ड विमानाची सोय

हिंदुस्थानात ICC T20 World Cup सुरू आहे. याच दरम्यान मध्य-पूर्वेत इराण, इस्रायल, अमेरिका अमेरिका यांच्या हल्ले प्रतिहल्ल्यांनंतर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मोठा फटका बसला. अनेक प्रवासी अडकून पडले आहेत. तर हिंदुस्थानात वर्ल्ड कप खेळण्यासाठी आलेल्या वेस्ट इंडिज संघाची देखील मायदेशी परतण्याची अडचण झाली. अखेर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) च्या मदतीने त्यांना चार्टर्ड विमानाची सोय करण्यात आल्याचे वृत्त आहे.

टी-२० वर्ल्ड कपमधील आव्हान संपुष्टात आल्यानंतरही हिंदुस्थानात अडकून पडलेल्या वेस्ट इंडिजच्या संघासाठी अखेर दिलासादायक बातमी समोर आली आहे. मध्यपूर्वेतील युद्धामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाल्याने हा संघ कोलकाता येथे अडकला होता. मात्र, आता ICC च्या विशेष पुढाकाराने शुक्रवारी एका चार्टर्ड विमानाद्वारे हा संघ मायदेशी रवाना होण्याची शक्यता आहे.

चार्टर्ड विमानाची सोय

पश्चिम आशियातील तणावामुळे विमानतळ बंद असल्याने वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वेच्या संघांचे परतीचे प्रवास रखडले होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आयसीसीच्या मदतीने वेस्ट इंडिजचा संघ शुक्रवारी चार्टर्ड विमानाने घरी परतणार आहे. या विमानाची तांत्रिक प्रक्रिया सध्या सुरू आहे.

डॅरेन सॅमीची आर्त हाक

‘मला फक्त घरी जायचे आहे’, अशी पोस्ट वेस्ट इंडिजचे मुख्य प्रशिक्षक डॅरेन सॅमी यांनी ‘X’ वर केली होती. कोलकात्यात हिंदुस्थानविरुद्धचा सामना गमावल्यानंतर हा संघ लगेच मायदेशी जाणार होता, मात्र विमान उड्डाणे रद्द झाल्याने खेळाडूंचा संयम सुटला होता.

झिम्बाब्वेचा संघ तुकड्यांमध्ये रवाना

सुपर ८ मधून बाहेर पडलेला झिम्बाब्वेचा संघही दुबईमार्गे जाणारी उड्डाणे रद्द झाल्याने अडकला होता. आता आयसीसीने त्यांच्यासाठी पर्यायी मार्गाची सोय केली आहे. हा संघ अदीस अबाबामार्गे हरारेला जात असून, शेवटची तुकडी शुक्रवारी रवाना होईल.

दक्षिण आफ्रिकेचाही मार्ग सुकर

न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीतील पराभवानंतर दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मायदेशी पाठवण्यासाठी आयसीसी प्रयत्नशील आहे. एमिरेट्स आणि एतिहाद विमान सेवा हळूहळू पूर्वपदावर येत असली तरी, आफ्रिकेचा संघ इथिओपियन एअरलाईन्सने जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मोठ्या प्रमाणावर हिंदुस्थानी प्रवासी देखील विविध देशांमध्ये अडकून पडले आहेत, त्यांना हिंदुस्थानात आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दुबईतून काही हिंदुस्थानींना परत आणण्यात आले आहे.

Comments are closed.