फुकट्या रेल्वे प्रवाशांवर कारवाईचा धडाका; पश्चिम रेल्वेने तीन महिन्यांत केली 58.79 कोटींची दंडवसुली

उपनगरी रेल्वेमध्ये विनातिकीट प्रवाशांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मागील काही महिन्यांत तिकीट तपासणी मोहिम तीव्र करण्यात आली आहे. लोकल ट्रेनबरोबरच मेल-एक्सप्रेस, पॅसेंजर ट्रेन आणि हॉलिडे स्पेशल गाड्यांमध्येही तिकीट तपासणी मोहीम राबवली जात आहे. याअंतर्गत पश्चिम रेल्वेने एप्रिल ते जून या तीन महिन्यांत विनातिकीट प्रवाशांकडून तब्बल 58.79 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे.
वैध तिकिट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आरामदायी प्रवास आणि चांगली सेवा देण्याच्या हेतूने पश्चिम रेल्वे प्रशासनाने ही विशेष मोहिम हाती घेतली आहे. वरिष्ठ व्यावसायिक अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली तिकीट तपासणी पथकांनी तीन महिन्यांत विशेष कामगिरी केली. त्यामुळे गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा सुमारे 13 टक्के जास्त दंड वसूल करण्यात आला.
पश्चिम रेल्वे मार्गावर जून महिन्यात तिकीटाशिवाय प्रवास केल्याची 2.42 लाख प्रकरणे आढळली. संबंधित प्रवाशांकडून 15.24 कोटी रुपये वसूल करण्यात आले. त्यात मुंबई उपनगरीय विभागातील 90 हजार प्रकरणांचा समावेश आहे. एसी लोकल ट्रेनमध्येही फुकट्या प्रवाशांचा टक्का वाढला आहे. त्यामुळे एसी लोकलसाठी समर्पित पथके कार्यरत आहेत. त्या पथकांमार्फत वारंवार तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या जात आहेत. या मोहिमांतर्गत एप्रिल ते जूनदरम्यान 18,750 बेकायदा प्रवाशांना दंड ठोठावून त्यांच्याकडून 63 लाख रुपये वसूल करण्यात आले. हा दंड गेल्या वर्षीच्या याच कालावधीपेक्षा 44 टक्क्यांनी अधिक आहे.
Comments are closed.