भारत-यूएस व्यापार कराराचे काय?
31 जुलै नजीक असताना अनेकांच्या मनात प्रश्न
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होणार की नाही, यासंबंधी राजकीय आणि आर्थिक वर्तुळात उत्सुकतेने चर्चा होत आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्यांची व्यापारी कर योजना 3 महिने पुढे ढकलली होती. तो कालावधी आता 1 ऑगस्टला संपत आहे. त्यामुळे 31 जुलैपर्यंत दोन्ही देशांमध्ये व्यापार करार झाला नाही, तर भारताच्या अमेरिकेला होणाऱ्या निर्यातीवर 26 टक्के कर लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसांमध्ये असा करार होईल काय, असा प्रश्न असून शेवटच्या क्षणी काहीतरी तोडगा निघू शकतो, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे. मात्र, सध्या कारारवरील चर्चा थांबली आहे.
येत्या दोन दिवसांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होण्याची शक्यता कमी असल्याचे दिसून येत आहे. तथापि, अद्यापही वेळ गेलेली नसून येत्या 48 तासांमध्ये तोडगा निघू शकतो, असा आशावाद जागा आहे, असे काही सूत्रांचे म्हणणे आहे. दोन्ही देशांच्या प्रतिनिधीमंडळांमधील चर्चेची पुढची फेरी 27 ऑगस्टला आहे. त्याच्या आत काही घडू शकेल काय, हा चर्चेचा विषय आहे.
आतापर्यंतची चर्चा सकारात्मक
आतापर्यंत भारत आणि अमेरिका यांच्यातील चर्चा सकारात्मक आणि रचनात्मक झाली आहे. दोन्ही बाजू करारासंबंधी आशावादी आहेत. अनेक मुद्दे आव्हानात्मक असले, तरी तोडगा निघण्याची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही. अमेरिकेच्या प्रतिनिधीमंडळाचे प्रमुख जेमीसन ग्रीर यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अमेरिकेची भूमिका सकारात्मक असल्याचे स्पष्ट केले.
कृषी उत्पादनांचा प्रश्न
भारत आणि अमेरिका यांच्यातील करारामध्ये सर्वात मोठा मुद्दा कृषी उत्पादनांचा आहे. अमेरिकेच्या कृषी उत्पादनांना, विशेषत: जनुकसुधारित कृषी उत्पादनांना भारताची बाजारपेठ मोकळी करुन देण्यास भारत उत्सुक नाही. तसे केल्यास भारतातील शेतकऱ्यांची मोटी हानी होण्याची शक्यता भारताला वाटते. तसेच, अमेरिकेच्या दुग्ध उत्पादनांसंबंधीही असाच मुद्दा आहे. तथापि, अन्य औद्योगिक उत्पादनांच्या संदर्भात तडजोड केली जाऊ शकते, अमेरिकेच्या काही औद्योगिक उत्पादनांवर भारताने यापूर्वीच कर कमी केलेले आहेत. ही प्रक्रिया भविष्यकाळातही चालू ठेवण्यास भारत राजी आहे, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कृषी उत्पादने वगळून करार ?
कृषी उत्पादनांचा वादग्रस्त प्रश्न सध्या बाजूला ठेवून अन्य उत्पादनांसंबंधी आणि सेवांसंबंधी एक प्राथमिक करार केला जाऊ शकतो, अशीही चर्चा होत आहे. भारताने ब्रिटनशी जो मुक्त व्यापार करार केला आहे, त्या आधारावर अमेरिकेशी करार केल्यास तो दोन्ही देशांसाठी लाभदायक ठरु शकतो, असे काही तज्ञांचे मत आहे. हा मुद्दा अमेरिकेने मान्य केल्यास येत्या काही दिवसांमध्ये करार होण्याची शक्यता असल्याचे काही सरकारी अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येते तीन दिवस या दृष्टीने महत्वाचे असून वेगाने प्रयत्न होत आहेत.
Comments are closed.