आप च्या पराभवाची कारणे कोणती आहेत?

आम आदमी पक्षाच्या पराभवाच्या कारणांची चर्चा आता होत आहे. अनेक कारणांचा उहापोह केला जात असला तरी प्रमुख अशी 5 कारणे आहेत…

  1. प्रस्थापित विरोधी भावना- हा पक्ष सलग 11 वर्षांहून अधिक काळ सत्तेवर आहे. त्यामुळे अनेक मतदारांमध्ये अन्य पक्षाला ंसंधी देण्याची भावना निर्माण झाली होती. एक पक्ष प्रदीर्घ काळ सत्तेवर राहिल्यास त्याच्या विरोधात नैसर्गिकरित्या अशी भावना निर्माण होते आणि मतदारच पर्याय शोधण्यासाठी उत्सुक असतात. या भावनेचा फटका या पक्षाला बसल्याची चर्चा आहे.
  2. अनेक नेत्यांचा पक्षत्याग- अरविंद केजरीवाल यांच्याशी व्यक्तीगत मतभेद आणि त्यांच्या कार्यशैलीशी जुळवून न घेता आल्याने अनेक दलीत आणि जाट समुदायाच्या नेत्यांनी पक्षांतर पेले. त्यांच्यातील अनेक नेत्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांच्यामुळे काँग्रेसची शक्ती फारशी वाढली नाही. मात्र, आम आदमी पक्षाला काही मतदारसंघ गमवावे लागले, असे दिसत आहे.
  3. मद्यधोरण घोटाळा- आम आदमी पक्षाच्या दुसऱ्या काळात मुख्यमंत्री केजरीवाल यांनी अचानक मद्यधोरणात परिवर्तन केले. नवे धोरण मद्य निर्माते आणि मद्य व्यापारी यांना लाभदायक होते. मद्याचा खप वाढावा असा या धोरणाचा हेतू होता. तथापि, आम आदमी पक्षाने आणि त्याच्या काही नेत्यांनी मद्यसम्राटांकडून कोट्यावधी रुपयांची लाच स्वीकारली आणि गोव्याची निवडणूक लढविण्यासाठी या पैशाचा उपयोग केला असा आरोप ठेवण्यात आला. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना या प्रकरणी अटकही झाली. केजरीवाल यांनाही अटक झाल्याने मुख्यमंत्रीपद सोडावे लागले. यामुळे पक्षाची प्रतिमा मलीन झाली. आम आदमी पक्षाचा उदयच भ्रष्टाचार विरोधी भावनेतून झाला होता. पण याच मुद्द्यावर आपली लोकप्रियता टिकवता न आल्याने पक्षाला मतदारांनी नाकारले. या घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या प्रवर्तन निदेशालयाने प्रत्यक्ष आम आदमी पक्षालाच या प्रकरणी आरोपी केले आहे. एक राजकीय पक्षच आरोपी असल्याचा प्रकार देशाच्या इतिहासात प्रथमच घडला आहे. या साऱ्याचा एकत्रित परिणाम झाला.
  4. विरोधी पक्षांच्या आघाडीतील बेबनाव- दिल्ली विधानसभा निवडणुकीत विरोधी पक्षांच्या आघाडीतील धुसफूस चव्हाट्यावर आली. आम आदमी पक्षा आणि काँग्रेस यांच्यात युती झाली नाही. विरोधी पक्षांच्या आघाडीतल्या इतर सर्व पक्षांनी आम आदमी पक्षाला पाठिंबा दिला आणि काँग्रेसला एकाकी पाडले. त्यामुळे संतापलेल्या काँग्रेसने ही निवडणूक जीव तोडून लढविली. त्यामुळे केँग्रेसची मते काही प्रमाणात वाढली. याचा फटका केजरीवाल यांना बसल्याचे दिसते.
  5. आश्वासनांची पूर्तता करण्यात अपयश- विनामूल्य वीज, विनामूल्य पाणी आणि महिलांना विनामूल्य बसप्रवास ही आश्वासने आम आदमी पक्षाने पूर्ण केली होती. तथापि, लोकांना पिण्याचे स्वच्छ पाणी पुरविण्याचे आश्वासन पूर्ण झाले नाही. विशेषत: झोपडपट्टी आणि गरीब वस्त्यांमध्ये स्वच्छ पाणी पुरविण्यात अपयश आल्याने रोगराई वाढल्याचे दिसून आले. यमुना नदी प्रदूषणमुक्त करण्याचे आश्वासनही पूर्ण झाले नाही. अनेक स्थानी आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाल्याचा अनुभव लोकांना आला. परिणामी, मतदारांनी पाठ फिरवली.
  6. शीशमहाल वाद भोवला- केजरीवाल प्रथम मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी आपण आलिशान सरकारी निवासस्थान उपयोगात आणणार नाही, अशी घोषणा केली होती. तसेच प्रवासासाठी आपली साधी कारच उपयोगात आणली जाईल, असे त्यांनी जाहीररित्या स्पष्ट केले होते. पण नंतर त्यांनी सरकारी आलीशान निवासस्थान स्वीकारले. तसेच सरकारचे कोट्यावधी रुपये खर्च करुन या निवासस्थानाचे रुपांतर अतिश्रीमंतांना शोभेल अशा राजवाडासदृश निवासस्थानात केले. त्यामुळे त्यांची सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा साध्या राहणीचा नेता अशी असलेली प्रतिमा नष्ट झाली. याचा विपरीत परिणाम पक्षाला भोगावा लागला.
  7. उमेदवारांची निवड वादग्रस्त- निवडणूक तोंडावर आल्यानंतर ऐनवेळी काही महत्वाच्या नेत्यांचे मतदारसंघ बदलण्यात आले. तसेच किमान 15 मतदारसंघांमध्ये तेथील स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात न घेता उमेदवारांची निवड करण्यात आली असा आरोप झाला. 18 आमदारांची तिकिटे कापण्यात आली. तिकिटे कापलेल्या चार आमदारांनी ऐनवेळी भारतीय जनता पक्षात प्रवेश करुन त्या पक्षाचा जोरदार प्रचार केला. त्यामुळेही आपची काही मते कमी झाली.

विजयाची कारणे…

योग्य नियोजन, संघाचा सहभाग

ड दिल्लीत भारतीय जनता पक्षाच्या विजयाचे श्रेय सुयोग्य नियोजन, तगडी प्रचार यंत्रणा आणि संघ परिवाराचा सक्रीय सहभाग यांना दिले जात आहे. संघ परिवाराने विविध जातीसमूह आणि समाजघटक यांच्या छोट्या छोट्या सभा घेऊन त्यांना भारतीय जनता पक्षाच्या जवळ आणले. दलितांच्या मनातील गैरसमज दूर करण्यासाठी योजनाबद्ध रितीने कार्य करण्यात आले. तिकिटे नाकारलेले नेते बंडखोरी करणार नाहीत, याची दक्षता घेण्यात आली.

ड लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला नेहमी दिल्लीत विधानसभा निवडणुकीपेक्षा 15 टक्के मते अधिक पडतात असे दिसून आले आहे. या विधानसभा निवडणुकीत ही 15 टक्के मते पक्षापासून दूर जाऊ नयेत म्हणून विशेष आणि लक्ष्यकेंद्री प्रयत्न करण्यात आले. या कामातही संघ परिवाराचे मोठे साहाय्य झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत होणारी मतांची गळती मोठ्या प्रमाणात थांबविण्यात पक्षाला यश आले, असे अनेक तज्ञांचे मत आहे.

ड प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी पक्षाच्या माहिती तंत्रज्ञान कक्षाकडून 30 लाख मतदारांशी संपर्क करण्यात आला. त्यांना मतदान करण्याचे व्यक्तीगत आवाहन करण्यात आले आणि मतदान केल्यानंतर तसे पक्षाला कळविण्याचे आवाहनही करण्यात आले, या अभिनव उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळल्याचे दिसून येत आहे. यामुळे या पक्षाचा मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी घराबाहेर पडला.

हिंदुत्वाचा ‘अदृष्य’ हात

भारतीय जनता पक्षाच्या विययात हिंदुत्वाच्या अदृष्य पण प्रभावी आणि परिणामकारक प्रवाहाचेही योगदान आहे, हे स्पष्ट होत आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीतही याचा प्रत्यय आला होता. हिंदुत्वाचा उघड प्रचार दिल्लीच्या विधानसभा निवडणुकीत करण्यात आला नाही. तथापि, मतदारांपर्यंत योग्य तो संदेश पोहचेल अशी व्यवस्था करण्यात पक्ष यशस्वी ठरल्याचे दिसते.

परिणाम काय होणार…

भाजपवर परिणाम

ड लोकसभा निवडणुकीत काहीसा फटका बसल्यानंतर जोमाने कामाला लागल्याचा लाभ पक्षाला झाला आहे. प्रथम हरियाणा, नंतर महाराष्ट्र आणि आता दिल्ली येथे मोठे विजय प्राप्त केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रतिमा अधिकच उजळ झाली आहे. केंद्र सरकारच्या स्थैर्यावरही या विजयांचा सकारात्मक परिणाम होणे शक्य आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील मित्र पक्षांचा भारतीय जनता पक्षावरील विश्वास या विजयांमुळे अधिक दृढ होऊ शकेल, असे तज्ञांचे मत आहे.

ड महाराष्ट्र, हरियाणा आणि दिल्लीतील विजयांमुळे तसेच जम्मू काश्मीरमध्येही उजळ कामगिरी केल्याने पक्षाला याचा लाभ राज्यसभेतील सदस्यसंख्या वाढविण्यासाठी होणार आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडीला आता राज्यसभेत बहुमतासाठी झगडावे लागणार नाही, अशी स्थिती लवकरच निर्माण होणार आहे. भारतीय जनता पक्ष हा कार्यकर्ताधारित पक्ष असल्याने अशा विजयांमुळे कार्यकर्त्यांचे मनोधैर्य अधिक उंचावले जाणार असून त्याचा लाभ पुढच्या विधानसभा निवडणुकांमध्ये होऊ शकतो, अशीही स्थिती आहे.

विरोधकांवर परिणाम

ड विरोधी पक्षांच्या आघाडीची स्थिती आम आदमी पक्षाच्या पराभवानंतर अधिक नाजूक होऊ शकते. या आघाडीतील काँग्रेसचे स्थान आत्ताच डळमळीत झाले आहे. ते या निवडणुकीनंतर अधिकच अस्थिर होऊ शकते. काँग्रेसमुळे आम आदमी पक्षाच्या काही जागा गमावल्याची चर्चा आता अधिकच जोरात होऊ शकते. आघाडीअंतर्गत असणारा काँग्रेसविरोध अधिकच तीव्र होऊ शकतो.

ड तथापि, काही तज्ञांच्या मते दिल्लीच्या परिणामामुळे काँग्रेसची बार्गेनिंग पॉवर वाढू शकते. आपल्याला सहभागी करुन घेतल्याशिवाय इतर विरोधी पक्ष निवडणूक जिंकू शकत नाहीत, असा प्रचार या पक्षाकडून केला जाऊ शकतो. तसेच काँग्रेसचे ‘उपद्रव मूल्य’ विरोधी आघाडील अन्य पक्षांना जाणविल्याने ते काँग्रेसला अधिक प्रमाणात सामावूनही घेऊ शकतात, असाही विचार व्यक्य केला जात आहे.

Comments are closed.