आशिया कपमध्ये सामना टाय झाल्यास कसा काढणार निकाल? सुपर ओव्हर की बॉल आऊट? वाचा सविस्तर
एशिया कप 2025 मध्ये सुपर ओव्हर किंवा बॉल आउट: आशिया चषकाची सुरुवात 9 सप्टेंबरपासून होणार आहे. भारतीय संघ सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरताना दिसणार आहे. तर शुबमन गिलला संघाचा उपकर्णधार बनवण्यात आलं आहे. यष्टीरक्षक म्हणून संजू सॅमसन आणि जितेश शर्मा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंत पायाच्या अंगठ्याच्या फ्रॅक्चरमुळे संघाबाहेर आहे. यंदाचा आशिया चषक टी20 फॉरमॅटमध्ये खेळला जाणार आहे. यामुळे एक प्रश्न समोर येतो की, जर या स्पर्धेत कोणताही सामना अनिर्णीत राहिला, तर सामन्याचा निकाल कसा काढला जाईल- बॉल आऊट की सुपर ओव्हर? (Asia Cup Ball Out)
आशिया चषकात सुपर ओव्हर की बॉल आऊट?
आशिया चषकात आजवर कोणताही सामना अनिर्णीत राहिलेला नाही, ज्यामुळे सुपर ओव्हर किंवा बॉल आऊट यापैकी कोणताही पर्याय निवडण्याची वेळ आली नाही. पण हेही खरे आहे की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून बॉल आऊट पद्धत 2008 मध्येच काढून टाकण्यात आली आहे. त्याऐवजी सामना बरोबरीत राहिल्यास सुपर ओव्हर खेळवण्याचा नियम आहे. टी20 क्रिकेटमध्ये 2008 साली आयसीसीने बॉल आऊटच्या जागी सुपर ओव्हरच्या नियमांचा समावेश केला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील पहिली सुपर ओव्हर 26 डिसेंबर, 2008 रोजी न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यातील सामन्यात झाली होती. यावरून हे स्पष्ट होते की, जर आशिया चषक 2025 मध्ये कोणताही सामना बरोबरीत संपला, तर त्याचा निकाल सुपर ओव्हरद्वारेच काढला जाईल. (Asia Cup Super Over)
सुपर ओव्हरही अनिर्णीत राहिली तर?
आयसीसीच्या नियमांनुसार, जर सामना बरोबरीत संपल्यानंतर सुपर ओव्हर झाली आणि ती देखील अनिर्णीत राहिली, तर आणखी एक सुपर ओव्हर खेळवली जाईल. जोपर्यंत सामन्याचा निकाल लागत नाही, तोपर्यंत हे सुरू राहील. (Super Over Rules)
Comments are closed.