Bathroom Camping: ऐकावे ते नवलच.. आता ‘बाथरूम कॅम्पिंग’चा ट्रेंड; फायदे कमी नुकसानच जास्त
मोबाईल हा आजकाल प्रत्येकाच्या हातात सतत असतो. काहींना बाथरूममध्ये तासंतास मोबाईल बघत बसण्याची सवय असते. ही कधीकाळी वाईट सवय मानली जात होती. मात्र आता बराच वेळ बाथरूममध्ये बसणे हा एक ट्रेंड झाला आहे. याच ट्रेंडला ‘बाथरूम कॅम्पिंग’ असे म्हंटले जाते. हो, तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल पण जेन झेड म्हणजे तरुणांमध्ये हा ट्रेंड वाढत आहे. विशेष म्हणजे त्याचे फायदे कमी आणि नुकसान जास्त आहे. हा ट्रेंड नेमका काय आहे आणि त्याचे परिणाम काय होतात ते जाणून घेऊया….
‘बाथरूम कॅम्पिंग’ म्हणजे काय?
बाथरूम कॅम्पिंग म्हणजे सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास गरज नसताना बराच वेळ बाथरूममध्ये राहणे. आता कॅम्पिंग म्हंटले की तुम्हाला वाटेल बाथरूममध्ये तंबू लावायचा का, तर तसे नाही. बाथरूम कॅम्पिंगमध्ये बसून गाणे ऐकणे, सोशल मीडिया स्क्रोल करणे, शांतपणे बसणे या गोष्टी केल्या जातात. हा ट्रेंड टिकटॉकवरील एका वापरकर्त्याच्या व्हिडिओने सुरू झाला. आता बऱ्याच ठिकाणी हा ट्रेंड वाढत आहे. जगभरात खूप गोंधळ असतो तेव्हा बाथरूम हे सर्वात सुरक्षित ठिकाण असते असे काहींचा समज असतो.
बाथरूम आता बनतंय पर्सनॅलिटी स्पेस
बाथरूममध्ये आता बेडरूम किंवा लिविंग रूमप्रमाणे सजावट केली जाते. फेअरी लाईट्स, लॅम्प, कार्पेट, वॉलपेपर लावले जातात. यालाच ‘टॉयलेटस्केपिंग’ म्हंटले जाते. त्यामुळे बाथरूम हे एक प्रकारे पर्सनॅलिटी स्पेस बनत चाललं आहे.
बाथरूम कॅम्पिंग चांगले की वाईट?
तज्ञांच्या मते, बाथरूममध्ये जास्त वेळ बसणे हे अस्वच्छ तर आहेच मात्र आरोग्यासाठीही जास्त धोकादायक आहे. त्यामुळे मूळव्याध, पचन समस्या इत्यादी आरोग्य समस्या देखील उद्भवू शकतात. प्रत्येक वेळी जेव्हा टॉयलेट फ्लश केले जाते तेव्हा बॅक्टेरिया आणि विषाणू हवेत सोडले जातात. ते सर्व गोष्टींवर पडतात. त्यामुळे बाथरूममध्ये आपल्या वस्तू नेणे, तिथे जास्त वेळ घालवणे हे आरोग्यासाठी घातक असू शकते.
Comments are closed.