विराट कोहलीला आऊट केल्यावर काय चर्चा झाली? गोलंदाजाने स्वतःच सांगितली 'ती' खास गोष्ट

विराट कोहलीने विजय हजारे ट्रॉफी 2025 -26 मध्ये आतापर्यंत 2 सामने खेळले आहेत. दोन्ही सामन्यांत कोहलीने शानदार फलंदाजी केली आहे. आंध्र प्रदेशविरुद्ध त्याने उत्कृष्ट शतक झळकावले, त्यानंतर गुजरातविरुद्धच्या सामन्यातही तो वेगाने शतकाकडे वाटचाल करत होता. त्याच वेळी विशाल जायस्वालच्या चेंडूवर उर्विल पटेलने त्याला यष्टीचित (Stump out) केले. सामना संपल्यानंतर ‘किंग कोहली’ने विशाल जायस्वालसोबत संवाद साधला, ज्याबद्दल विशालने आता माहिती दिली आहे.

गुजरात क्रिकेट संघाविरुद्ध दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करत होता. संघाचा सुपरस्टार फलंदाज विराट कोहली वेगाने शतकाकडे सरकत होता. कोहलीने या डावात 61 चेंडूत 77 धावांची खेळी केली, ज्यामध्ये 13 चौकार आणि 1 षटकार मारला. कोहलीला 77 धावांवर विशाल जायस्वालने बाद करून माघारी धाडले. सामना संपल्यानंतर कोहलीने विशाल जायस्वालशी चर्चा केली. त्याबद्दल ‘टाइम्स ऑफ इंडिया’शी बोलताना विशाल म्हणाला, “तुम्ही खूप चांगली गोलंदाजी करता, अशीच मेहनत करत राहा. तुमची संधी नक्की येईल, संयम ठेवा आणि प्रयत्न करत राहा.” विशेष म्हणजे या सामन्यात विशालने कोहलीव्यतिरिक्त ऋषभ पंत, नितीश राणा आणि अर्पित राणा यांनाही बाद केले आहे.

या सामन्यात दिल्लीच्या संघाने 50 षटकांत 254 धावा केल्या होत्या, ज्यामध्ये कोहलीची खेळी अत्यंत महत्त्वाची होती. प्रत्युत्तरात गुजरातचा संघ 247 धावांतच गारद झाला. दिल्लीच्या प्रिन्स यादवने 8.4 षटकांत 3 बळी घेतले. विराट कोहलीच्या शानदार खेळीमुळे त्याला ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून निवडण्यात आले. विशाल जायस्वालने 10 षटकांत 42 धावा देऊन 4 बळी घेतले. विराट कोहली आता विजय हजारे ट्रॉफी 2025-26 मध्ये पुढे खेळण्याची शक्यता कमी आहे. किंग कोहली आता टीम इंडियासाठी न्यूझीलंडविरुद्ध खेळताना दिसेल.

Comments are closed.