एआय काय निर्णय घेईल …
भाज्या आणि फळे विकत घेताना नीट पाहून आणि पारखून घ्याव्यात असा नियम आहे. आपल्यापैकी प्रत्येकजण तो पाळतो. फळे आणि भाज्या हातात घेऊन, दाबून आणि पाहून पारखली जातात. फळे ताजी आणि योग्य प्रकारे पिकलेली असावीत, अशी आपली इच्छा असते. त्यामुळे ही पारख हातानेच केली जाते.
पण आता कोणती फळे घ्यावीत हे आपल्याला कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समजणार आहे. असे एक उदाहरण घडले आहे. ते सोशल मिडियावर प्रसिद्धही झाले आहे. एका महिलेला टरबूज विकत घ्यायचे होते. ते चांगले पिकलेले आणि गोड असावे, अशी तिची इच्छा होती. साधारणत: टरबुजाचा वास घेऊन किंवा त्याच्यावर हाताने थोपटून ते पिकेलेले आहे की नाही, हे ठरविले जाते. पण या महिलेने त्या टरबुजांच्या ढिगाचे छायाचित्र घेतले आणि ते चॅटजीपीटीशी कनेक्ट करुन कोणते टरबूज घेऊ, असा प्रश्न विचारला.
चॅटजीपीटीने तिला एक विशिष्ट टरबूज घ्या असा सल्ला ते छायाचित्र अभ्यासून दिला. महिलेने ते टरबूज घेतले. चॅटजीपीटीची सूचना योग्य आहे की नाही, याची पडताळणी तिने त्याच स्थानी करण्याचा निर्णय घेतला. तिने त्या टरबूज विक्रेत्याकडून ते कापून घेतले आणि त्याच्या एका तुकड्याची चव घेऊन पाहिली. तिला आश्चर्याचा धक्का बसला. कारण चॅटजीपीटीची निवड अत्यंत योग्य ठरली होती. त्याने निवडलेल्या टरबुजाची चव आणि पक्वता दोन्ही त्या महिलेला हवी तशीच होती. हा व्हिडीओ प्रसिद्ध झाल्यानंतर असंख्य लोकांनी तो पाहून त्यावर आपली मतेही व्यक्त केली आहेत. चॅटजीपीटी हा कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञानाचाच आविष्कार आहे. त्यामुळे पुढच्या काळात हे तंत्रज्ञान आपल्याला खरेदीतही साहाय्य करणार अशी शक्यता निर्माण झाली आहे. वस्तू किंवा पदार्थांची निवड आपल्यापेक्षाही हे साधन अधिक चांगल्या प्रकारे करु शकते, असे या व्हिडीओवरुन स्पष्ट होत आहे. हा लाभही आहे पण धोक्याचा इशाराही आहे.
Comments are closed.