विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित-विराटचा पुढचा सामना कधी? पहा संपूर्ण वेळापत्रक
विजय हजारे ट्रॉफीमध्ये (26 डिसेंबर) रोजी दिल्ली, मुंबई, पंजाब आणि हरियाणासह अनेक संघांनी विजय मिळवला. एका बाजूला विराटने 77 धावांची अर्धशतकी खेळी करून दिल्लीला गुजरातवर 7 धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. दुसरीकडे, रोहित शर्मा आपल्या दुसऱ्या सामन्यात फ्लॉप ठरला आणि खातं न उघडताच बाद झाला. तरीही मुंबईने उत्तराखंडचा 51 धावांनी पराभव केला. आता प्रश्न असा आहे की रोहित आणि विराट आपला पुढचा सामना कधी खेळणार?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराट कोहली आणि रोहित शर्मा विजय हजारे ट्रॉफीमध्ये आपापल्या संघासाठी फक्त दोन-दोन सामनेच खेळणार होते. याचा अर्थ असा की आता भारतीय संघाचे हे दोन्ही अनुभवी फलंदाज विजय हजारे ट्रॉफीमध्ये पुन्हा खेळताना दिसणार नाहीत.
विजय हजारे ट्रॉफीचा समारोप 18 जानेवारीला होईल, पण त्यापूर्वीच भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका सुरू होईल. न्यूझीलंडचा संघ लवकरच भारत दौऱ्यावर येणार आहे, जिथे दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 5 टी20 सामने खेळले जातील.
भारत विरुद्ध न्यूझीलंड वनडे मालिका 11 जानेवारीपासून सुरू होणार आहे, त्यामुळे विराट कोहली आणि रोहित शर्मा आता थेट 11 जानेवारीलाच क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करतील. या दोन्ही खेळाडूंनी टी20 मधून निवृत्ती घेतली आहे, त्यामुळे ‘रो-को’ (ROKO) न्यूझीलंडविरुद्धच्या टी20 मालिकेत खेळणार नाहीत.
विजय हजारे ट्रॉफीमध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहलीने प्रत्येकी दोन-दोन सामने खेळले. विराटने पहिल्या सामन्यात दिल्लीसाठी 131 धावांची खेळी केली होती, तर दुसऱ्या सामन्यात 77 धावा फटकावल्या. त्याने 2 सामन्यांत 208 धावा केल्या. दुसरीकडे, मुंबईसाठी खेळताना रोहित शर्माने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात 155 धावा केल्या होत्या, परंतु दुसऱ्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला.
Comments are closed.