लाडकी बहिणींना डिसेंबरची ओवाळणी जानेवारीत मिळणार?; सरकारच्या निर्णयाकडे लक्ष

पुणे: राज्याचं हिवाळी अधिवेशन नागपुरात पार पडलं आहे. यावेळी विधानसभेत बोलताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी लाडकी बहीण योजनेबाबत महत्त्वाची माहिती दिली होती. हिवाळी अधिवेशनानंतर डिसेंबरची रक्कम दिली जाणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते. तर आम्ही जी आश्वासनं दिली आहेत, ती आम्ही पूर्ण करणार आहोत. कुणीही मनात शंका ठेऊ नये. लाडकी बहीण योजना सुरूच राहणार आहे, असं फडणवीस यांनी सभागृहात म्हटलं होतं. अधिवेशन संपल्यानंतर लाडक्या बहिणींना डिसेंबरचे पैसे मिळणार आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. मात्र, आता लाडक्या बहिणींना खात्यामध्ये पैसे कधी जमा होणार असा प्रश्न पडला आहे. 

अधिवेशन संपलं, आता डिसेंबर महिना संपत आला, तरी राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात अद्याप रक्कम जमा झालेली नाही. त्यामुळे सरकारच्या निर्णयाकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलं आहे. महायुती सरकारने राज्यातील महिलांसाठी आर्थिक मदत देण्यासाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. या योजनेचे काही निकष ठरवण्यात आलेले होते. या लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहिन्याला 1500 रुपये देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. योजना जाहीर झाल्यानंतर जुलै ते नोव्हेंबरपर्यंतचे साडेसात हजार रुपये महायुती सरकारने महिलांच्या खात्यात दिवाळीपूर्वीच जमा केले होते. 

त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचं बिगुल वाजलं आणि आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे सरकारने 15 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत दिली होती. त्यानंतर आता लाडक्या बहिणी डिसेंबर महिन्याची रक्कम कधी मिळते त्या प्रतिक्षेत असल्याचं दिसून येत आहे. त्याचबरोबर महायुती सरकारकडून निवडणुकींच्या आधी  महायुती सरकार सत्तेवर आल्यानंतर 1500 ही रक्कम वाढवून ती 2100 केली जाईल असं आश्वासन देण्यात आलं होतं, त्यानुसार आता महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर ही रक्कम कधी वाढवणार याबाबतही महिलांना उत्सुकता लागलेली आहे. मात्र, आता मार्चमध्ये राज्याचं  अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर या रकमेत वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये जरी अधिवेशनानंतर रक्कम जमा होईल असे सांगितले असले, तरी लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात 1500 रुपयांचा हप्ता जमा होण्यासाठी आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना नव्या वर्षातच हप्ता मिळण्याचा अंदाज आहे. 

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे  1500 की 2100 रुपये मिळणार? 

महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांना त्यांची सत्ता आल्यास दरमहा 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार महिलांना अर्थसंकल्पानंतर 2100 रुपयांप्रमाणं रक्कम मिळू शकेल. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस आणि मंत्री अदिती तटकरे यांनी यापूर्वी माहिती दिली आहे. त्यामुळं महिलांना डिसेंबरच्या हप्त्यामध्ये दरमहा 1500 रुपये मिळतील. 

लाडकी बहीण योजनेचे निकष काय? 

* वय 21 ते 60 वर्षे
* दरमहा 1500 रुपये मिळणार
* दरवर्षी शासन 46000 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार
* अंमलबजावणी : जुलै 2024 पासून 

कोण असणार पात्र?

* महाराष्ट्र रहिवासी 
* विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला
* लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रु.2.50 लाखापेक्षा जास्त नसावे
* 60 वर्षे पेक्षा जास्त वय असेल तर अपात्र असाल

अपात्र कोण असेल?

* 2.50 लाख पेक्षा जास्त उत्पन्न असणारे
* घरात कोणी Tax भरत असेल तर
* कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्तीवेतन घेत असेल तर
* कुटुंबात 5 एकर पेक्षा जास्त जमीन असेल तर
* कुटुंबातील सदस्यांकडे 4 चाकी वाहन असेल तर ( ट्रॅक्टर सोडून )

Comments are closed.