टी20 वर्ल्ड कपचे संपूर्ण वेळापत्रक समोर, जाणून घ्या टीम इंडिया कुठे आणि कधी खेळणार सामने?

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (ICC) ने महिला टी20 वर्ल्ड कप 2026 चे पूर्ण वेळापत्रक आधीच जाहीर केले आहे. या विश्वचषकाचे यजमानपद इंग्लंडकडे असेल. स्पर्धा 12 जून ते 5 जुलै या दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 12 संघ सहभागी होणार आहेत आणि त्यांच्यात 33 सामने खेळले जाणार आहेत.

या स्पर्धेतील पहिला सामना 12 जून रोजी यजमान इंग्लंड आणि श्रीलंका (ENG vs SRI) यांच्यात होणार आहे. भारतीय महिला संघ (Indian cricket women’s team) आपला पहिला सामना 14 जून रोजी पाकिस्तानविरुद्ध खेळेल. (IND vs PAK)

या वर्ल्ड कपमध्ये सहभागी असलेल्या 12 संघानी प्रत्येकी 6-6 संघांचे दोन गट बनवले आहेत. गट अ (Group A) मध्ये भारत, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघांना ठेवले आहे. उर्वरित 2 संघ ग्लोबल क्वालिफायर्समधून गट अ मध्ये येतील. तसेच गट ब (Group B) मध्ये इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका आणि वेस्ट इंडीज हे संघ आहेत. उर्वरित दोन संघाचा निर्णय ग्लोबल क्वालिफायर्समधून होईल.

प्रत्येक गटातील पहिल्या दोन क्रमांकाच्या संघांना सेमीफायनलमध्ये प्रवेश मिळेल. सेमीफायनल सामने 30 जून आणि 2 जुलै रोजी द ओव्हल मैदानावर खेळवले जातील. अंतिम सामना 5 जुलै रोजी लॉर्ड्स मैदानावर होणार आहे.

भारतीय संघ (Team india) आपल्या मोहिमेची सुरुवात 14 जूनला पाकिस्तानविरुद्ध करेल. भारतीय संघाचा दुसरा सामना 17 जूनला ग्लोबल क्वालिफायर्समधून येणाऱ्या संघाविरुद्ध असेल. तिसरा सामना 21 जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आणि चौथा सामना 24 जून रोजी ग्लोबल क्वालिफायर्समधून आलेल्या दुसऱ्या संघाविरुद्ध होणार आहे. गटातील अखेरचा सामना भारत 28 जून रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळणार आहे.

Comments are closed.