IPL 2026: जोश हेझलवूड बंगळुरूमध्ये दाखल, आरसीबीसाठी पहिल्या सामन्यात खेळणार? वाचा सविस्तर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (आरसीबी) आणि सनरायझर्स हैद्राबाद (एसआरएच) यांच्यात आयपीएल २०२६ च्या हंगामाचा पहिला सामना खेळला जाणार आहे. हा सामना शनिवारी (२८ मार्च) एम चिन्नास्वामी स्टेडियम, बंगळुरू येथे खेळला जाणार आहे. आरसीबीचे मुख्य प्रशिक्षक ऍंडी फ्लॉवर यांनी एसआरएच विरुद्धच्या सामन्याआधी चाहत्यांना एक मोठा धक्का दिला आहे. वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड सलामीच्या सामन्यात संघाच्या अंतिम ११ मध्ये नसणार. फ्लॉवर यांनी त्यामागचे कारण सांगितले आहे.

हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे हेझलवूड संपूर्ण ऍशेस मालिकेला मुकला होता. तसेच तो गेल्या वर्षी मायदेशात दक्षिण आफ्रिका आणि भारताविरुद्धच्या काही मर्यादीत षटकांच्या सामन्यात खेळला होता. शेफिल्ड शील्डच्या सामन्यातही तो खेळला होता, मात्र मागील काही महिन्यांपासून तो क्रिकेटपासून दूर आहे.

सामन्याच्या एक दिवस आधी फ्लॉवर म्हणाले, “हेझलवूड काल भारतात आला. तो फिट दिसत आहे. त्याला चांगली विश्रांती मिळाली आहे, मात्र पुनरागमन करण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली आहे. त्याने ड्रेसिंग रुमच्या बैठकिमध्ये सहभागही नोंदवला. तो नुकताच आल्याने पहिल्या सामन्यासाठी तयार नाही. आम्ही त्याच्या तंदुरुस्तीवर लक्ष ठेवून आहोत आणि आम्हाला आशा आहे की तो लवकरच आयपीएलमध्ये खेळेल.”

हेझलवूडने २०२५ च्या हंगामात आरसीबीसाठी उत्तम कामगिरी केली होती. त्याने १२ सामन्यांमध्ये १७.५५ च्या सरासरीने आणि ८.७७ च्या इकॉनॉमी रेटने २२ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामध्ये एका सामन्यात चार विकेट्स घेण्याचीही कामगिरी त्याने केली आहे. त्यामुळे तो त्या हंगामात सर्वाधिक विकेट्स घेणारा तिसरा गोलंदाज ठरला होता.

तसेच आरसीबीला हा हंगाम वेगवान गोलंदाज यश दयाल याच्याशिवाय खेळावा लागणार आहे. त्याने काही वैयक्तिक कारणांमुळे या हंगामामधून माघार घेतली आहे. त्यानेही २०२५ च्या हंगामात आरसीबीच्या विजेतेपदामध्ये चांगली कामगिरी केली होती. तो आता या हंगामासाठी उपलब्ध नसल्याने फ्रॅंचायजीने मंगश यादव आणि अभिनंदन सिंग यांचा संघात समावेश केला आहे. तसेच संघात रसिक दार आणि भुवनेश्वर कुमार हे वेगवान गोलंदाज आहेतच.

यामुळे आपल्या प्रमुख दोन वेगवान गोलंदाजांशिवाय आयपीएल २०२६ मध्ये गतविजेता कशी सुरूवात याकडे लक्ष असणार आहे.

Comments are closed.