विधेयक मंजूर झाले तेव्हा राहुल गांधी कुठे होते?

माकप खासदाराने विचारला प्रश्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

माकप खासदार जॉन ब्रिटास यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या अनुपस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत ‘चाय पे चर्चा’मध्ये काँग्रेस नेत्या प्रियांका वड्रा सामील झाल्याबद्दल त्यांनी टीका केली आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून आयोजित टी पार्टीत प्रियांका वड्रा सामील झाल्याने जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. खासकरून भाजपने काही तासांपूर्वी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी अधिनियमाला (मनरेगा) समाप्त केले असताना प्रियांका वड्रा यात सामील झाल्याची टिप्पणी ब्रिटास यांनी केली. प्रियांका वड्रा आणि अन्य खासदारांनी पंतप्रधानांसोबत टी पार्टीत सामील होणे आमच्यासाठी चांगले दृश्य नव्हते. प्रियांका वड्रा यांना चांगल्याप्रकारे मार्गदर्शन केले जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती. तुलनात्मक स्वरुपात किरकोळ मुद्द्यांसाठी देखील आम्ही अशाप्रकारच्या टी पार्टीपासून दूर राहिलो आहोत असा दावा माकप खासदाराने केला.

विरोधी पक्षाने जाणूनबुजून अशाप्रकारच्या बैठकांपासून अंतर राखले होते. कारण सरकार ‘एसआयआर’वर चर्चेसाठी तयार नव्हते. त्यापूर्वी जेव्हा वक्फ विधेयक संख्याबळाच्या जोरावर संमत करण्यात आले, तेव्हाह आम्ही टीपार्टीपासून दूर राहिलो होतो असे ब्रिटास म्हणाले.

चुकीचा संदेश गेला

टी पार्टीची घटना नुकसानदायक असल्याचे म्हणत ब्रिटास यांनी अन्य मुद्द्यांच्या तुलनेत हा एक अत्यंत मोठा मुद्दा होता असे म्हटले आहे. प्रियांका वड्रा यांचे पंतप्रधानांसोबत चहा पिणे एक अजब दृश्य होते. यामुळे देशाच्या लोकांना एक चुकीचा संदेशही गेला असल्याचा दावा त्यांनी केला.

परिषदेदरम्यान परदेश दौरा?

विरोधी पक्षांची एकता आणि देशाच्या गरीब लोकांच्या कल्याणासाठी नुकसानदायक असलेल्या मैत्रीला मी मानत नाही असेही त्यांनी म्हटले आहे. तर हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेत राहुल गांधींच्या अनुपस्थितीवर त्यांनी चिंता व्यक्त केली. संसदेचे अधिवेशन सुरू असताना विदेश दौरे का करण्यात आले? विरोधी पक्षांचा हिस्सा म्हणून राहुल गांधींनी संसदेत उपस्थित रहायला हवे होते, तीन जनविरोधी विधेयके मांडली जात असतानाच राहुल गांधी हे संसदेत नव्हते. परंतु यासंबंधीचा निर्णय त्यांनी आणि त्यांच्या राजकीय पक्षाने घ्यायला हवा होता असे ब्रिटास यांनी म्हटले आहे.

Comments are closed.