पाटलांच्या मुखातून ‘ज्ञानू’ बोलले, निवडणुका ईव्हीएमवर घ्या नाहीतर कागदावर, जिंकणार आम्हीच!
मतचोरीच्या मुद्दय़ावरून मोदी सरकार व मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात वातावरण पेटलेले असतानाच राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मोठा दावा केला. ‘निवडणुका ईव्हीएमवर घ्या किंवा कागदावर, जिंकणार आम्हीच,’ असे ते म्हणाले. त्यांच्या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा असून पाटलांच्या मुखातून ज्ञानूच बोलले, अशी प्रतिक्रिया उमटली आहे.
पुणे शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या प्रचारासाठी सोलापूर दौऱ्यावर असताना पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला. विरोधकांकडून ईव्हीएमवर घेतल्या जाणाऱया संशयावर त्यांनी या वेळी भाष्य केले. विरोधकांची अवस्था ‘नाचता येईना अंगण वाकडे’ अशी झाली असल्याचे ते म्हणाले. दिल्ली आणि ओडिशातील विद्यापीठांत बॅलेट पेपरवर झालेल्या निवडणुका आम्ही जिंकल्या आहेत. पदवीधर व शिक्षण मतदारसंघाच्या निवडणुकीतही आमचाच विजय होईल, असे ते म्हणाले.
Comments are closed.