उशिरा येणाऱ्या खेळाडूंकडून कॅप्टन ईशान किशन वसूल करायचा 1000 रुपयांचा दंड! प्रशिक्षकाने केला खुलासा

इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२६ च्या हंगामात सनरायझर्स हैद्राबादचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स सुरूवातीच्या काही सामन्यांसाठी उपलब्ध नसणार आहे. त्यामुळे विकेटकीपर-फलंदाज ईशान किशनला नेतृत्वाची जबाबदारी दिली आहे. त्याने यापूर्वी झारखंडचा कर्णधार म्हणून उत्कृष्ठ कामगिरी केली आहे. आयपीएलच्या नवीन हंगामासाठी सर्व संघ जोमाने तयारीला लागले आहेत.
शनिवारी (२१ मार्च) झालेल्या सराव सामन्यात ईशानने अभिषेक शर्माच्या साथीने स्फोटक फलंदाजी केली. ईशानने २४ चेंडूमध्ये ७२ धावा केल्या. तो या आयपीएल हंगामात हैद्राबादचे नेतृत्व करणार आहे. त्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये झारखंडचे कर्णधारपद भुषविले आहे. त्याने सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये नेतृत्व करताना संघाला विजेतेपद जिंकून दिले होते. आता त्याला हैद्राबादचे कर्णधार केल्याने झारखंडचे सहाय्यक प्रशिक्षक सनी गुप्ता यांनी ईशानच्या नेतृत्व कौशल्याबद्दल एक धक्कादायक खुलासा केला आहे.
गुप्ता यांनी ईशानने कर्णधारपदाची सुत्रे हातात घेतल्यावर कोणते नियम बदलले हे सांगितले आहे. ईशानने एक गोष्ट स्पष्ट केली होती की, विजय असो वा पराजय ड्रेसिंग रुमचे वातावरण नेहमी आनंदी असले पाहिजे. कोणताही प्रशिक्षक खेळाडूला सर्वांसमोर रागावणार नाही, ते केवळ त्याच्याशी खाजगीतच बोलतील. एखाद्या फलंदाजाचा किंवा गोलंदाजाची कामगिरी वाईट झाली असेल तर त्याने मान खाली घालून बसायचे नाही.
माध्यामांशी बोलताना गुप्ता यांनी ईशानच्या नेतृत्वाबाबत म्हटले, “ईशान हा एक साधा खेळाडू आहे. त्याला मिळालेल्या अपार यशाने तो कधीही हूरळून जात नाही. भारतीय खेळाडू असूनही तो आमच्यासोबत ई-रिक्षाने प्रवास करायचा.”
“तो जेव्हा कर्णधार बनला तेव्हा त्याने संघासाठी एक नियम केला होता, संघाच्या बसमध्ये उशिरा येणाऱ्या कोणत्याही खेळाडूला एक हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्याने हा नियम स्वत: वरही लागू केला,” असेही गुप्ता यांनी पुढे सांगितले आहे.
ईशानचे नेतृत्व आता चाहत्यांना आयपीएलमध्ये पाहायला मिळणार आहे.
Comments are closed.