मंत्रालयाजवळील सेवायोजन कार्यालयाच्या जागेत भाजपा प्रदेश कार्यालयाची घुसखोरी, 15 हजार चौरस फूट जागेवर विस्ताराचा डाव; महायुती सरकारने आदेश काढला
मंत्रालयाच्या समोरील मोक्याच्या जागेवर असलेल्या पक्ष कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्षाला मेट्रो रेल्वेमुळे पाणी सोडावे लागले आहे. मात्र दुसरीकडे भाजपने मोकळ्या असलेल्या एम्प्लॉयमेंट एक्सचेंजच्या जागेत घुसखोरी केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या अखत्यारीतील सामान्य प्रशासन विभागाने तब्बल 15 हजार चौरस फूट जागा भाजप प्रदेश कार्यालयाला तीस वर्षांच्या भाडेकरारावर दिली आहे. त्याबाबत आदेशही जारी करण्यात आले आहेत.
मंत्रालयाशेजारील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या कार्यालयासमोर भाजपचे प्रदेश कार्यालय आहे. 2 हजार 682 चौरस फुटांची ही जागा भाजपला भाडेतत्त्वावर देण्यात आली आहे. या जागेचा भाडेकरार अलीकडेच वाढवण्यात आला होता. ही जागा कमी पडू लागल्याने भाजपला प्रदेश कार्यालयाच्या उजव्या बाजूलगतची तब्बल 15 हजार चौरस फूट नवी जागा देण्याचा निर्णय झाला आहे. नवी जागा 1 जानेवारी 2025 ते 31 डिसेंबर 2054 अशा 30 वर्षांच्या भाडेकरारनाम्याने दिली जाणार आहे. ही जागा अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे.
पक्ष कार्यालयाची जागा रिझर्व्ह बँकेला
मुंबई मेट्रो 3 च्या प्रकल्पामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, वंचित बहुजन आघाडी या पक्षांना आपली कार्यालये स्थलांतरित करावी लागली. मेट्रो प्रकल्पाच्या कामाला सुरुवात होण्यापूर्वी या पक्षांची कार्यालये मंत्रालयासमोर होती. मेट्रो प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर या पक्षांना पुन्हा त्याच ठिकाणी जागा देण्याचे आश्वासन मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने दिले होते. मात्र, नंतर मंत्रालयासमोरील या मोक्याच्या भूखंडाची विक्री रिझर्व्ह बँकेला करण्यात आली. त्यामुळे विरोधी पक्षांच्या कार्यालयांना मंत्रालय परिसरातून कायमचे विस्थापित व्हावे लागले आहे; पण भाजपने प्रदेश कार्यालयासाठी 15 हजार चौरस फुटांची सरकारी जागा ताब्यात घेतली आहे.
Comments are closed.