शुबमन गिल-श्रेयस अय्यर नव्हे, सुरेश रैनाच्या मते रोहितनंतर हा खेळाडू बनावा वनडे कर्णधार!
कसोटी आणि टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या रोहित शर्माने (Rohit Sharma) 2027 चा वनडे वर्ल्ड कप खेळणार का? या प्रश्नावर अजूनही संभ्रम कायम आहे. काही रिपोर्ट्समध्ये असा दावा केला आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धची वनडे मालिका संपल्यानंतर रोहित वनडे क्रिकेटमधूनही निवृत्ती जाहीर करू शकतो.
अशा परिस्थितीत अनेक दिग्गजांनी रोहितनंतरच्या वनडे कर्णधारासाठी आपापली मतं मांडायला सुरुवात केली आहे. काही माजी खेळाडूंनी शुबमन गिलचं (Shubman gill) नाव पुढे केलं आहे, तर एका रिपोर्टनुसार बोर्डाला रोहितनंतर श्रेयस अय्यरला (Shreyas iyer) कर्णधार बनवायचं आहे.
पण यामध्ये माजी खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) वेगळीच निवड केली आहे. रैनाच्या मते, हार्दिक पांड्या (Hardik pandya) वनडे कर्णधारपदासाठी योग्य दावेदार आहे. त्याने म्हटलं की हार्दिकमध्ये महेंद्रसिंह धोनीसारखे (MS Dhoni) काही गुण आहेत. इतकंच नाही तर त्याची तुलना त्याने कपिल देव (Kapil dev) यांच्यासोबतही केली.
गेल्या वर्षी जेव्हा रोहित आणि विराट कोहली यांनी टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली , तेव्हा कर्णधारपदासाठी सर्वात पहिलं नाव हार्दिक पांड्याचं होतं. मात्र, त्यावेळी निवड समितीने हार्दिकच्या फिटनेसकडे लक्ष वेधत सूर्यकुमार यादवकडे (Suryakumar Yadav) कर्णधारपद सोपवलं.
शुभंकर मिश्रा यांच्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना रैनाने स्पष्ट केलं, शुबमन गिल हा कोणत्याही दिवशी कॅप्टन होऊ शकतो. पण मला वाटतं की हार्दिक पांड्या पांढऱ्या चेंडूच्या वनडे-टी20 क्रिकेटमध्ये कर्णधार म्हणून मोठी कामगिरी करेल. गिलही पर्याय आहे, पण मला वाटतं की हार्दिकलाच पुन्हा संधी मिळायला हवी. त्याच्याकडे कपिल पाजींसारखं अनुभवाचं बॅलन्स आहे. मग ती फलंदाजी असो, गोलंदाजी असो किंवा क्षेत्ररक्षण.
रैनाने पुढे म्हटलं, तो खूप पॉझिटिव्ह व्यक्ती आहे. त्याने जे प्रदर्शन केलंय, त्यामुळे तो ‘प्लेअर्स कॅप्टन’ आहे. मैदानात तो ज्या पद्धतीने खेळाडूंशी बोलतो, त्यांच्याशी वागतो, त्याची ऊर्जा यात मला थोडं माही (धोनी) सारखं काहीतरी दिसतं.
हार्दिक पांड्याने आतापर्यंत 94 वनडे सामने खेळले आहेत. त्यात त्याने 32.82 च्या सरासरीने आणि 110.89 च्या स्ट्राईक रेटने 1904 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजीत 5.60 च्या इकॉनॉमी रेटने 91 विकेट्स घेतल्या आहेत.
याशिवाय, रैनाने रोहित आणि कोहलीबद्दलही मत व्यक्त केलं. तो म्हणाला, रोहित आणि कोहली यांनी 2027 चा वनडे वर्ल्ड कप नक्की खेळावा. कारण त्यांनी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे, त्यांच्याकडे प्रचंड अनुभव आहे. रोहित घरच्या मैदानावर खेळतो, सरावही करत आहे. अंतिम निर्णय मात्र निवड समितीकडेच आहे की ते कशी टीम तयार करतात.
Comments are closed.