T20WC2026: सेमीफायनलमध्ये पावसाने खोळंबा केला तर काय होणार? जाणून घ्या आयसीसीचे नियम

टी-20 विश्वचषक 2026 आता (icc T20 international world cup 2026) नॉकआउट टप्प्यात पोहोचला असून भारत, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या चार संघांनी सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल 4 मार्चला, तर दुसरी 5 मार्चला खेळवली जाणार आहे. मात्र, या महत्त्वाच्या सामन्यांपूर्वी चाहत्यांच्या मनात एकच मोठा प्रश्न आहे. जर सेमीफायनलमध्ये पाऊस पडला तर काय होईल? सामना रद्द झाल्यास कोणता संघ फायनलमध्ये पोहोचेल?

सेमीफायनलच्या दिवशी दोन्ही संघांचे खेळाडू आणि चाहत्यांची हीच इच्छा असेल की पूर्ण 20-20 ओव्हरचा सामना पाहता यावा. मात्र, पाऊस किंवा खराब हवामानामुळे खेळात अडथळा आला, तर सामन्याचा निकाल लावण्यासाठी आयसीसीच्या नियमानुसार दोन्ही डावांत किमान 10-10 ओव्हर्सचा खेळ होणे अनिवार्य आहे.

आयसीसीने दोन्ही सेमीफायनल सामन्यांसाठी ‘रिझर्व्ह डे’ (राखीव दिवस) ठेवला आहे. जर नियोजित दिवशी किमान 10 ओव्हरचा खेळ होऊ शकला नाही, तर सामना राखीव दिवशी खेळवला जाईल. मात्र, जर राखीव दिवशीही पाऊस पडला आणि 10-10 ओव्हरचा खेळ होऊ शकला नाही, तर सामना रद्द केला जाईल. अशा स्थितीत, सुपर-8 टप्प्यात जो संघ आपल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी होता, तो थेट फायनलमध्ये प्रवेश करेल.

जर पाऊसामुळे सामना रद्द झाला, तर याचा मोठा फायदा दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडला होईल. कारण सुपर-8 टप्प्यात हे दोन्ही संघ आपापल्या ग्रुपमध्ये अव्वल स्थानी होते. दक्षिण आफ्रिका ग्रुप ‘ए’ मध्ये पहिल्या क्रमांकावर होती, तर इंग्लंडचा संघ ग्रुप ‘बी’ मध्ये टॉपर होता. याचाच अर्थ, सामना रद्द झाल्यास टीम इंडिया आणि न्यूझीलंड स्पर्धेतून बाहेर पडतील.

सेमीफायनलचे वेळापत्रक:
पहिली सेमीफायनल: 4 मार्च – दक्षिण आफ्रिका विरुद्ध न्यूझीलंड (ईडन गार्डन्स, कोलकाता).

दुसरी सेमीफायनल: 5 मार्च – भारत विरुद्ध इंग्लंड (वानखेडे स्टेडियम, मुंबई).

Comments are closed.