आशिया कपमध्ये कोणाचे पारडे जड? पाकिस्तानकडून टीम इंडियाला किती वेळा मिळाला पराभव
आशिया कपची सुरुवात 9 सप्टेंबर 2025 पासून होणार आहे. टीम इंडिया या स्पर्धेत विजेतेपदाची मोठी दावेदार मानली जात आहे. यावेळी आशिया कपमध्ये एकूण 8 संघ खेळणार आहेत. भारतासोबत पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, ओमान, हाँगकाँग आणि नेपाळ हे संघ मैदानात उतरतील. 1984 साली पहिल्यांदा आशिया कप खेळवण्यात आला होता. त्यानंतर हा स्पर्धा अनेक वेळा रंगली असून भारत आणि पाकिस्तानही एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. चला तर जाणून घेऊया, आतापर्यंत कोणाचे पारडे जड ठरले आहे.
आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात अनेकदा सामना झाला आहे. आतापर्यंत दोन्ही संघ 18 वेळा आमनेसामने आले आहेत. त्यापैकी टीम इंडियाने 10 सामने जिंकले आहेत, तर पाकिस्तानने 6 वेळा विजय मिळवला आहे. दोन्ही संघांतील 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. आशिया कपचे आयोजन वनडे आणि टी20 आंतरराष्ट्रीय या दोन्ही फॉरमॅटमध्ये झालेले आहे.
वनडे आशिया कपमध्ये दोन्ही देशांमध्ये आतापर्यंत 15 सामने खेळले गेले आहेत. त्यापैकी 8 सामने टीम इंडियाने जिंकले, तर पाकिस्तानला 5 वेळा विजय मिळाला आहे. 2 सामने अनिर्णित राहिले आहेत. टी20 फॉरमॅटमध्ये झालेल्या आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तानची फक्त 3 वेळा भिडंत झाली आहे. त्यापैकी 2 सामने भारताने आणि 1 सामना पाकिस्तानने जिंकला आहे. एकूण पाहता टीम इंडिया पाकिस्तानपेक्षा आघाडीवर आहे आणि आशिया कपच्या इतिहासात तिला फक्त 6 वेळाच पाक संघाकडून पराभव स्वीकारावा लागला आहे.
2025 च्या आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार आहे. हा रोमांचक मुकाबला 14 सप्टेंबरला दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडिया सध्या खूप मजबूत दिसत आहे, तर पाकिस्तानच्या स्क्वाडमध्ये बाबर आझम आणि मोहम्मद रिझवान यांना स्थान मिळालेलं नाही. त्यामुळे भारतीय संघ विजयासाठी फेव्हरेट मानला जात आहे. दोन्ही संघांच्या टी20 आंतरराष्ट्रीय रेकॉर्डकडे पाहिलं, तर आतापर्यंत 13 सामने झाले आहेत. त्यापैकी 10 वेळा भारताने बाजी मारली आहे, तर 3 वेळा पाकिस्तानने विजय मिळवला आहे. आता पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे की आशिया कपमध्ये यावेळी कोणाचा झेंडा फडकतो.
Comments are closed.