T20 WC26: न्यूझीलंडविरुद्ध शतकी खेळी करणारा युवराज समरा नक्की कोण? युवराज सिंगशी आहे खास कनेक्शन

कॅनडाच्या युवराज सिंग समराने मंगळवारी (१७ फेब्रुवारी) न्यूझीलंडविरुद्धच्या टी२० विश्वचषक २०२६च्या सामन्यात शतकी खेळी करत इतिहास रचला. १९ वर्षाच्या या खेळाडूने न्यूझीलंडच्या मातब्बर गोलंदाजांना चांगलेच धुतले. त्याने ६५ चेंडूत ११० केल्या. त्याने वेगवान गोलंदाज कायले जेमिसनच्या चेंडूवर चौकार मारत आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील त्याचे पहिले शतक पूर्ण केले.

या खेळीमुळे युवराज टी२० विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासातील शतक करणारा सर्वात युवा खेळाडू ठरला आहे. त्याचबरोबर तो या स्पर्धेत १०० धावा पूर्ण करणारा पहिला असोसिएट संघाचा खेळाडूही ठरला आहे. या सामन्याआधी त्याने या स्पर्धेत एकही अर्धशतकही केले नव्हते. त्यामुळे त्याने त्याच्या पहिल्या अर्धशतकाचे शतकात रुपांतर केले.

युवराजचे नाव भारताचा दिग्गज अष्टपैलू युवराज सिंगच्या नावाशी जुळणारे आहे. त्याचे वडिल बलजीत सिंग हे युवराज सिंगचे मोठे चाहते आहे. त्यामुळेच त्यांनी त्यांच्या मुलाचे नावही युवराज ठेवले. तसेच ते दोनदा युवराज सिंगला भेटलेही आहेत. २०१९मध्ये टोरंटो नेशनल्स आणि दुसऱ्यांदा २०२५मध्ये सुपर ६०च्या स्पर्धेदरम्यान त्यांनी युवराजची भेट घेतली.

युवराज समराने कॅनडासाठी ८ वनडे आणि १९ टी२० सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर कॅनडासाठी सर्वात जलद अर्धशतक करण्याचा विक्रमही आहे. त्याने बहामासविरुद्ध १५ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या होत्या.

Comments are closed.