सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार? याची चौकशी करून कारवाई करावी; रोहित पवार यांची मागणी

सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे. नवनिर्वाचित सरन्यायाधीश भूषण गवई यांचा रविवारी महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशन व इतर बार कौन्सिलच्या वतीने सत्कार करण्यात आला. सत्कार कार्यक्रमात सरन्यायाधीशांनी प्रोटोकॉलचा मुद्दा उपस्थित करत अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीवरून उघड नाराजी व्यक्त केली. यावरूनच आता रोहित पवार यांनी ही मागणी केली आहे.

X वर एक पोस्ट करत ते म्हणाले आहेत की, “देशातील न्यायपालिकेच्या सर्वोच्च पदावर विराजमान होण्याचा सन्मान सरन्यायधीश भूषण गवई यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सुपुत्राला मिळत असेल तर ही आपल्या प्रत्येकासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे. अशा परिस्थितीत सरन्यायधीश गवई हे सरन्यायाधीश झाल्यानंतर राज्यात प्रथमच येत असतील तर त्यांचा यथोचित मानसन्मान राखणं ही राज्याची जबाबदारी असताना याचा राज्य सरकारला विसर पडणं हे लांच्छनास्पद आहे. सरन्यायाधीशांच्या अवमानाची जबाबदारी राज्य सरकारला झटकात येणार नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि संविधानावर अपार निष्ठा आणि श्रद्धा असलेली व्यक्ती सरन्यायाधीशपदी येणं याचं तर दुःख सरकारला झालं नाही ना? अशी शंका येते आणि तसं नसेल तर सरन्यायाधीशांच्या अवमानास कोण जबाबदार आहे, याची सखोल चौकशी करुन त्यांच्यावर योग्य कारवाई करावी.”

Comments are closed.