भारतीय संघात अश्विनची जागा घेणारा तनुष कोटियन आहे तरी कोण?
मेलबर्न येथे गुरुवारपासून सुरू होणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी मुंबईचा अष्टपैलू तनुष कोटियनला भारतीय संघात सामील करण्यात आलंय. सध्या अहमदाबाद येथे विजय हजारे ट्रॉफी खेळत असलेला कोटियन मंगळवारी दुपारी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. अष्टपैलू अक्षर पटेलला ऑस्ट्रेलियाला जायचं होतं. परंतु तो त्याच्या मुलाच्या जन्मामुळे मायदेशी परतला आहे. यानंतर कोटियनला भारतीय कसोटी संघात सामील होण्याची संधी मिळाली, असं सूत्रानं सांगितलं.
कोटियन सध्या भारतीय देशांतर्गत सर्किटमधील सर्वोत्तम ऑफ-स्पिन अष्टपैलू खेळाडूंपैकी एक आहे. यापूर्वी तो बॉर्डर-गावस्कर मालिकेपूर्वी दोन चार दिवसीय सामन्यांसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेल्या भारत अ संघाचा भाग होता. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे.
ब्रिस्बेनमधील गाबा येथे पावसानं प्रभावित तिसरी कसोटी अनिर्णित राहिल्यानंतर अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. यानंतर तनुष कोटियनचा भारतीय संघात समावेश करण्यात आला. तो आता वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांच्यासह भारतासाठी तिसरा फिरकी गोलंदाजी अष्टपैलू पर्यायांपैकी एक असेल. सुंदरनं पर्थमध्ये पहिली कसोटी खेळली होती, तर जडेजा ब्रिस्बेनमधील तिसरी कसोटी खेळला होता.
26 वर्षीय तनुष कोटियन हा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आहे, जो देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचं प्रतिनिधित्व करतो. त्यानं गेल्या काही काळापासून आपल्या कामगिरीनं सर्वांना प्रभावित केलंय. कोटियन उजव्या हातानं ऑफ ब्रेक गोलंदाजी करतो. याशिवाय तो फलंदाजीही करू शकतो.
कोटियननं 2023/24 रणजी ट्रॉफीच्या 10 सामन्यांमध्ये 16.96 च्या सरासरीनं 29 बळी घेतले आहेत. मुंबईनं यावर्षी आपली 42वी रणजी ट्रॉफी जिंकली, ज्यात त्यानं 502 धावा केल्या होत्या. या दरम्यान कोटियनच्या बॅटमधून 5 अर्धशतकं आणि 1 शतक निघालं. एकूणच कोटियनने 33 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत, ज्यात त्यानं 41.21 च्या सरासरीनं 2,523 धावा केल्या, तर 25.7 च्या सरासरीनं 101 विकेट्स घेतल्या आहेत.
सोमवारी झालेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेतील क गटातील सामन्यात कोटियनला त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी सामनावीर पुरस्कार मिळाला. त्याच्या कामगिरीमुळे मुंबईनं सर्व्हिसेसचा तीन गडी राखून पराभव केला. त्यानं गेल्या मोसमात राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल पदार्पण केलं होतं.
हेही वाचा –
विनोद कांबळी या आजाराने त्रस्त आहे, मेडिकल रिपोर्टमध्ये सत्य उघडकीस
भारतीय संघातून हा महत्त्वाचा खेळाडू बाहेर होणार, नेमकं कारण जाणून घ्या
टीम इंडियात नव्या अष्टपैलू खेळाडूची एंट्री, बॉर्डर-गावस्कर मालिकेत अश्विनच्या जागी संधी मिळणार
Comments are closed.