टी20 इतिहासात नवे पान? सूर्यकुमार यादव एमएस धोनीच्या विश्वविक्रमाला स्पर्श करणार

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज धर्मशाला येथील हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यासाठी मैदानावर उतरल्यानंतर, भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव माजी कर्णधार एमएस धोनीची एका खास यादीत बरोबरी करेल. भारतासाठी सर्वाधिक टी-20 सामने खेळणाऱ्या खेळाडूंची ही यादी आहे. धोनी या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे, तर सूर्यकुमार यादव चौथ्या क्रमांकावर आहे.

धर्मशाला टी-20 सामन्यात, सूर्या आज धोनीच्या विक्रमाची बरोबरी करेल आणि संयुक्त तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल. यामुळे तो रोहित शर्मा, विराट कोहली आणि हार्दिक पांड्या यांच्या यादीत सामील होईल. रोहित-कोहली जोडीने 2024चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.

सूर्यकुमार यादवने आतापर्यंत 97 टी-20 सामने खेळले आहेत, ज्यात 35.98 च्या सरासरीने आणि 163.96च्या स्ट्राईक रेटने 2771 धावा केल्या आहेत. दरम्यान, एमएस धोनीने त्याच्या कारकिर्दीत 98 टी20 सामने खेळले, 37.60 च्या सरासरीने 1617 धावा केल्या. धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने 2007 चा टी20 विश्वचषक पहिल्यांदाच जिंकला.

आतापर्यंत फक्त तीन खेळाडूंनी भारतासाठी 100 किंवा त्याहून अधिक टी20 सामने खेळले आहेत. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेच्या अखेरीस, सूर्यकुमार यादव या यादीत सामील होणारा चौथा भारतीय होईल.

भारतासाठी सर्वाधिक टी20 सामने खेळण्याचा विक्रम माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये 159 सामने खेळले आहेत. 150 पेक्षा जास्त सामने खेळणारा तो एकमेव भारतीय आहे. विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर अष्टपैलू हार्दिक पंड्या तिसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतासाठी सर्वाधिक टी-20 सामने खेळलेले खेळाडू

रोहित शर्मा – १५९
विराट कोहली – १२५
हार्दिक पांड्या – १२२
एमएस धोनी – ९८
सूर्यकुमार यादव – ९७

आगामी 2026 च्या टी-20 विश्वचषकापूर्वी भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादवचा फॉर्म अजूनही चिंतेचा विषय आहे. या वर्षी त्याची फलंदाजी पूर्णपणे निष्प्रभ ठरली आहे. 2026 मध्ये, त्याने 19 सामने खेळले, ज्यामध्ये फक्त 14.35 च्या सरासरीने 201 धावा केल्या. तो एकदाही 50 धावांचा टप्पा गाठू शकला नाही. आयसीसीच्या मेगा इव्हेंटपूर्वी भारतीय कर्णधाराचा खराब फॉर्म भारताला त्रास देत आहे.

Comments are closed.