दादांना ब्लॅकमेल कोण करत होतं? रोहित पवारांची खरमरीत पोस्ट

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणावरून सुरू असलेल्या राजकीय चर्चेच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी,  राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार असल्याची टीका त्यांनी केली. तसेच राष्ट्रवादीच्या अंतर्गत विषयात भाजपने हस्तक्षेप करू नये, असा इशाराही त्यांनी दिला. तसेच याच पोस्टमध्ये त्यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या मुद्द्यावरूनही भाजपला लक्ष्य केले. पीसीएमसी निवडणुक तसेच मुंढवा प्रकरणी दादांना ब्लॅकमेल कोण करत होतं? हे आदेश कुणाचे होते असा सवाल उपस्थित केला. त्यामुळेच भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या विषयात न बोललेलेच बरे, अशा शब्दांत त्यांनी भाजपला सुनावले.

रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका मांडली. “विलीनीकरणाची चर्चा तर नाहीच आणि भाजपसोबत असताना विलीनीकरणाचा तर विषयसुद्धा येत नाही. त्यामुळे ‘आमच्याशिवाय दोन्ही राष्ट्रवादींचे एकत्रीकरण होणार नाही’, हे मुख्यमंत्र्यांनी केलेले वक्तव्य म्हणजे सत्तेचा अहंकार आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाचा निर्णय हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय असून, त्यावर भाजपच्या नेत्यांनी भाष्य करण्याची गरज नसल्याचे रोहित पवार यांनी आपल्या पोस्टमधून स्पष्ट केले.

Comments are closed.