IND vs SA: श्रेयस अय्यर खेळू शकला नाही तर संघापुढे मोठं प्रश्नचिन्ह? नंबर-4 साठी कोण असेल योग्य पर्याय?
भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान (IND vs SA) दोन कसोटी सामन्यांची मालिका झाल्यानंतर 30 नोव्हेंबरपासून तीन वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे. या वनडे मालिकेसाठी अद्याप भारतीय संघाची घोषणा झालेली नाही. मात्र, या मालिकेसाठी टीम इंडियाच्या वनडे संघात काही बदल पाहायला मिळू शकतात.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वनडे मालिकेदरम्यान संघाचा उपकर्णधार श्रेयस अय्यर (Shreyas iyer) गंभीर जखमी झाला होता. जखमेच्या कारणाने त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. आता अशी माहिती समोर येत आहे की, अय्यरचं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळणं कठीण आहे. तो या मालिकेसाठी पूर्णपणे फिट होऊ शकणार नाही, अशी शक्यता आहे.
अशा परिस्थितीत प्रश्न उभा राहतो, श्रेयस अय्यर बाहेर गेल्यास टीम इंडियासाठी नंबर-4 वर कोण फलंदाजी करणार? ऑस्ट्रेलिया मालिकेत श्रेयस अय्यरने नंबर-4 ची जबाबदारी उत्तमपणे सांभाळली होती. 2023 च्या वनडे विश्वचषकात आणि त्यानंतर अनेक मालिकांमध्येही त्याने या स्थानावर उत्कृष्ट कामगिरी केली होती. पण आता तो जखमी असल्याने या क्रमांकावर कोण खेळणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितले आहे की अय्यरच्या दक्षिण आफ्रिका मालिकेत खेळण्याबाबत अनिश्चितता कायम आहे. अय्यरला पूर्णपणे फिट होण्यासाठी अजून वेळ लागणार आहे. बोर्ड त्याच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे आणि घाईघाईत कोणताही निर्णय घ्यायचा नाही, असेही सांगण्यात आले आहे. अय्यरला पूर्ण बरा होण्यासाठी किमान एक महिना लागेल. त्यामुळे तो जानेवारीत होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा खेळण्यासाठी उपलब्ध होऊ शकतो.
जर श्रेयस अय्यर दक्षिण आफ्रिका मालिकेसाठी संघातून बाहेर राहिला, तर ऋषभ पंत (Rishbh Pant) किंवा तिलक वर्मा (Tilak Verma) यांपैकी एखाद्याला संघात स्थान मिळू शकते. पंत आता पूर्णपणे फिट आहे आणि त्याला कसोटी मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आले आहे. पंत आणि तिलक दोघेही अय्यरच्या जागी नंबर-4 वर फलंदाजी करू शकतात.
मात्र, या स्थानासाठी तिलक वर्मा हा सर्वात योग्य पर्याय मानला जात आहे. त्याने अलीकडील टी20 मालिकेत अप्रतिम फलंदाजी केली आहे. आशिया कप 2025 च्या अंतिम सामन्यातही त्याने भारताला विजय मिळवून देणारी खेळी केली होती. त्याचबरोबर, या मालिकेसाठी हार्दिक पांड्या आणि रवींद्र जडेजा यांचंही संघात पुनरागमन होण्याची शक्यता आहे.
Comments are closed.