IPL 2026: आयपीएल 2026 स्पर्धेच्या प्लेऑफमध्ये कोण पोहचणार? केविन पीटरसनची मोठी भविष्यवाणी! RCB ला केलं बाहेर
आयपीएल (IPL 2026) स्पर्धेचा थरार आता हळूहळू वाढत आहे. 28 मार्च रोजी या स्पर्धेला सुरुवात झाली असून सर्व संघांचा आतापर्यंत प्रत्येकी 1-1 सामना झाला आहे. या हंगामात कोणते चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचतील याचा अंदाज लावणे सध्या कठीण वाटत असले, तरी इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू आणि दिल्ली कॅपिटल्सचा मार्गदर्शक राहिलेल्या केविन पीटरसनने (Kevin Peterson) एक मोठी भविष्यवाणी केली आहे. पीटरसनने अशा चार संघांची नावे सांगितली आहेत जे या हंगामात प्लेऑफमध्ये जागा मिळवू शकतात.
दिल्ली कॅपिटल्सचा माजी मेंटॉर पीटरसनच्या मते, मुंबई इंडियन्स (MI), दिल्ली कॅपिटल्स (DC), राजस्थान रॉयल्स (RR) आणि पंजाब किंग्स (PBKS) हे संघ आयपीएल 2026 च्या प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात, मात्र खेळाडूंच्या अचानक होणाऱ्या दुखापतींमुळे यामध्ये बदल होऊ शकतो असेही त्याने म्हटले आहे. पीटरसनने आपल्या सोशल मीडिया ‘एक्स’ अकाऊंटवर लिहिले की, या हंगामातील आयपीएलचे पहिले सामने पाहिल्यानंतर आणि सध्याच्या परिस्थितीनुसार MI, DC, RR आणि PBKS हे चार संघ प्लेऑफमध्ये पोहोचू शकतात. मात्र दुखापत किंवा इतर कारणांमुळे यात बदलही होऊ शकतो.
पीटरसनने गतविजेत्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) संघाचा आपल्या या यादीत समावेश केलेला नाही. त्याने म्हटले की, माझ्या मते आरसीबीसाठी या हंगामात मधली षटके, फिरकीपटू आणि हेझलवूडची फिटनेस हे चिंतेचे विषय असतील. आरसीबीने स्पर्धेची सुरुवात विजयाने केली आहे. संघाने पहिल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेट्सनी पराभव केला होता. आता आगामी सामन्यांमध्ये हेझलवूडची कामगिरी कशी राहते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
पीटरसनच्या मते, पाच वेळचा विजेता चेन्नई सुपर किंग्स (CSK), तीन वेळा जेतेपद मिळवणारा कोलकाता नाईट रायडर्स (KKR) आणि 2016 चा विजेता सनरायझर्स हैदराबाद (SRH) यांना या हंगामात टॉप-4 मध्ये पोहोचण्यासाठी काहीतरी खास करावे लागेल आणि आपल्या खेळात मोठे बदल करावे लागतील. सहा सामन्यांनंतर आयपीएल 2026 च्या गुणतालिकेत राजस्थान रॉयल्सचा संघ पहिल्या स्थानावर आहे. संघाचा नेट रन रेट 4.171 आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर आरसीबीचे नाव आहे.
Comments are closed.