आंद्रे रसेलची जागा कोण घेणार? अभिषेक नायर यांनी सुचवली या 3 खेळाडूंची नावे!

कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) संघ सध्या मोठ्या बदलांच्या टप्प्यातून जात आहे. आयपीएल २०२६ च्या मिनी लिलावात (Mini Auction) फ्रँचायझीने काही नवीन नावांवर बोली लावत मोठा जुगार खेळला आहे. गेल्या १० वर्षांत या संघाचा सर्वात मोठा सुपरस्टार आंद्रे रसेल राहिला आहे, मात्र रसेलने आता आयपीएल २०२६ मधून निवृत्ती घेतली आहे. अशा परिस्थितीत, फ्रँचायझीला त्याच्यासारखाच दुसरा ‘मॅच विनर’ खेळाडू तयार करावा लागणार आहे. आयपीएल सीझन १९ पूर्वी, संघाचे मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी रसेलच्या बदली खेळाडूबाबत (Replacement) मोठे विधान केले आहे.

​आंद्रे रसेल दीर्घकाळापासून केकेआरसाठी खेळला असून तो संघासाठी सर्वात मोठा मॅच विनर ठरला आहे. आता त्याच्या अनुपस्थितीत ‘मॅच फिनिशर’ची भूमिका कोण बजावणार, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. याबद्दल पत्रकार परिषदेत बोलताना मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर म्हणाले, “आंद्रे रसेल या फ्रँचायझीसाठी नेहमीच आधारस्तंभ राहिला आहे. त्याने टी-२० क्रिकेटमध्ये जे साध्य केले आहे, तसे करणे सोपे नाही. गोलंदाजीत त्याच्याकडून काही चुका नक्कीच झाल्या, पण त्याची फलंदाजी शानदार राहिली आहे. आता त्याच्या जागी आपल्या संघात रिंकू सिंग आणि रमणदीप सिंग सारखे खेळाडू ती कसर भरून काढू शकतात. रिंकूने अनेक प्रसंगी भारतीय संघासाठी चांगली कामगिरी केली आहे, तर रमनदीपने देखील फिनिशरची भूमिका बजावली आहे. आम्हाला आशा आहे की हे दोन्ही खेळाडू या संधीचा पूर्ण फायदा घेतील.”

​याशिवाय, मुख्य प्रशिक्षक अभिषेक नायर यांनी युवा खेळाडू तेजस्वी दहिया याचे नावही घेतले आहे. तेजस्वी दहियाने अलीकडच्या काळात बॅटने अतिशय प्रभावी कामगिरी केली आहे. तसेच, आंद्रे रसेलची अष्टपैलू (All-rounder) खेळाडूची जागा भरून काढण्यासाठी फ्रँचायझीने २५.२० कोटी रुपये खर्च करून कॅमेरून ग्रीनला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. तो कदाचित ४ थ्या किंवा ५ व्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. आता आयपीएल २०२६ मध्ये हे खेळाडू कशी कामगिरी करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. रसेलने चेंडू आणि फळी अशा दोन्ही माध्यमांतून अप्रतिम खेळ केला होता, त्यामुळे त्याची जागा घेणे या खेळाडूंसाठी मोठे आव्हान असेल.

Comments are closed.