दम असेल तर रोखून दाखवा! रोहित-विराटच्या भविष्यावर ‘या’ दिग्गजाचं तुफानी वक्तव्य

रोहित शर्मा आणि विराट कोहली (Rohit Sharma & Virat Kohli) आता करिअरच्या शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत आहेत. त्यामुळे त्यांच्या निवृत्तीबाबत चर्चा सुरू आहे. सध्या ते दोघेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वनडे मालिकेत खेळत आहेत. चाहत्यांना अपेक्षा आहे की, हे दोन्ही दिग्गज खेळाडू 2027 च्या वनडे वर्ल्डकपपर्यंत मैदानात दिसावेत.

रोहित-विराटच्या भवितव्याबाबत माजी भारतीय खेळाडू नवजोत सिंग सिद्धू (Navjyot Singh Siddhu) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यांनी थेट निवडकर्त्यांनाच चॅलेंज दिलं आहे.

स्टार स्पोर्ट्सवर बोलताना सिद्धू म्हणाले, विराट कोहली जे काही करतो, त्यात त्याची खास छाप दिसतेच. पण तरीही तो केवळ स्वतःची ओळख निर्माण करून थांबत नाही, तर इतरांनाही प्रेरणा देतो. तुम्हाला सुमेरु पर्वत माहिती आहे ना? त्याची जागा बदलली, पण विराट आणि रोहित हे असे पर्वत आहेत जे कायम राहणार. त्यांची उंची हिमालयाइतकी आहे. खरंच, विराट आणि रोहित हे हिमालयाएवढेच उंच आहेत.

यानंतर सूर्याशी तुलना करत सिद्धू म्हणाले, याहून मोठं गिफ्ट काय असू शकतं? या दोघांनी एक ‘सुवर्ण पिढी’ भारतीय क्रिकेटला दिली आहे. सूर्य आपल्या प्रकाशाचं वेगळं पुरावा देतो का? त्याचा प्रकाशच त्याचा पुरावा असतो. अगदी तसेच विराट-रोहित यांची कामगिरी ऐतिहासिक आहे.

सिद्धू पुढे म्हणाले, बदल नेहमीच प्रगती नसतो. जो बदल तुम्हाला अधिक चांगलं बनवतो, तोच खरी प्रगती असते. प्रगती म्हणजे जीवन, प्रगती म्हणजे विकास. जे भारतीय क्रिकेटचं नाव उंचावतात, त्याला विस्तार देतात, त्यांना थांबवण्याचं धाडस करून दाखवा. जर कोणाच्यात खरंच दम असेल, तर ‘रो-को’ (रोहित-कोहली) ला थांबवून दाखवा.

Comments are closed.