घाऊक महागाईचा दर आठ महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचला आहे
डिसेंबर महिन्यात 0.83 टक्क्यांपर्यंत वाढ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
डिसेंबर 2025 मध्ये भारताच्या घाऊक किंमत निर्देशांक (डब्ल्यूपीआय) आधारित महागाईत लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली. सरकारी आकडेवारीनुसार, डिसेंबरमध्ये घाऊक महागाई 0.83 टक्क्यांपर्यंत वाढली असून ही गेल्या आठ महिन्यांतील सर्वोच्च पातळी आहे. नोव्हेंबरमध्ये नोंदवलेल्या -0.32 टक्क्यांनंतर ही वाढ झाली आहे. ही वाढ निर्धारित अपेक्षेपेक्षा खूपच जास्त असल्याचा दावा केला जात आहे. ऑक्टोबरमध्ये हाच दर -1.21 टक्क्यांपर्यंत खाली गेला होता. त्यानंतरच्या दोन्ही महिन्यांमध्ये महागाई दरात वाढ झालेली दिसून येते. उत्पादन, खनिजे आणि अन्न उत्पादनांच्या किमतींमध्ये वाढ झाल्याने घाऊक महागाई डिसेंबरमध्ये वाढल्याचे मुख्य कारण मानले जात आहे.
सरकारी आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यापासून अन्नपदार्थांच्या किमती वाढताना दिसत आहेत. दैनंदिन वापराच्या वस्तूंसाठी महागाई उणे 2.93 टक्क्यांवरून 0.21 टक्क्यांपर्यंत वाढली. तसेच अन्नधान्य उत्पादनांचा महागाई निर्देशांक उणे 2.60 टक्क्यांवरून 0 टक्क्यांपर्यंत वाढला. इंधन आणि वीजेसाठी घाऊक महागाई -2.27 टक्क्यांवरून कमी होऊन -2.31 टक्क्यांपर्यंत कमी झाली. तसेच उत्पादित वस्तूंसाठी घाऊक महागाई 1.33 टक्क्यांवरून 1.82 टक्क्यांपर्यंत वाढली.
किरकोळ महागाईतही वाढ
यापूर्वी किरकोळ महागाई दरही पुन्हा वाढल्याचे दिसून आले होते. भाज्या आणि डाळींच्या किमती वाढल्यामुळे डिसेंबर 2025 मध्ये किरकोळ महागाई 1.33 टक्क्यांवर पोहोचली. गेल्या तीन महिन्यांतील ही सर्वोच्च पातळी आहे. यापूर्वी, नोव्हेंबरमध्ये महागाई कमी होती. तथापि, आरबीआयच्या निर्धारित मानकांपेक्षा हा दर कमी असल्यामुळे सद्यस्थितीत महागाई अजूनही नियंत्रणात असल्याचे मानले जाते. केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँक दोघेही महागाईवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. सांख्यिकी मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, महागाई दरात चढ-उतार होत असल्याचे दिसून येत आहे.
चालू आर्थिक वर्षातील घाऊक महागाई दर
महिना महागाई दर
एप्रिल 2025 0.85 टक्के
मे 2025 0.39 टक्के
जून 2025 -0.13 टक्के
जुलै 2025 -0.58 टक्के
ऑगस्ट 2025 0.52 टक्के
सप्टेंबर 2025 0.13 टक्के
ऑक्टोबर 2025 -1.21 टक्के
नोव्हेंबर 2025 -0.32 टक्के
डिसेंबर 2025 0.83 टक्के
Comments are closed.