गेइटी-गॅलेक्सी चित्रपटगृहाचे शो का थांबले? मालक मनोज देसाईंनी सांगितले यामागचे खरे कारण
मुंबईमधील वांद्रे येथील प्रसिद्ध गेईटी- गॅलेक्सी चित्रपटगृहातील शो हे तात्पुरते बंद करण्यात आले आहेत. चित्रपटगृहाच्या परवान्याचे नूतनीकरण न झाल्याने, चित्रपटगृह बंद असल्याची चर्चा सुरू झाली होती. परंतु या चर्चांना फेटाळून लावत या चित्रपटगृहाचे कार्यकारी संचालक मनोज देसाई यांनी तांत्रिक बिघाडामुळे चित्रपटगृहातील शो हे बंद करण्यात आल्याचे म्हटले आहे.
चित्रपटगृहातील काही केबल्स या जळाल्यामुळे, नवीन केबल्स मुंबईतील लोहार चाळीमधून मागवण्यात येत असल्याचे देसाई यांनी सांगितले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर चित्रपटगृहातील शो पुन्हा एकदा सुरू होतील असे मत देसाई यांनी व्यक्त केले आहे. असे वृत्त टाइम्स आॅफ इंडियाने दिले आहे. पत्रकार नरेंद्र गुप्ता यांनी इन्स्टाग्रामवर चित्रपटगृहाबाहेरील एक नोटीस शेअर केल्यानंतर गेइटी-गॅलेक्सीच्या बंदची माहिती समोर आली. या नोटीसमध्ये चित्रपटगृहाच्या परवान्याचे नूतनीकरण झाले नसल्याचे, म्हटले आहे. त्यामुळेच पुढील काही शोसाठी सिनेमा बंद ठेवण्यात आल्याचे नमूद करण्यात आले होते. त्यामुळेच याबाबत उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
मिर्झापूर द मुव्ही हा चित्रपट गेइटी-गॅलेक्सीमध्ये नुकताच प्रदर्शित झाला होता. यावेळी चित्रपटातील अभिनेता अली फजलने भेट दिली होती. चित्रपटगृहाबाहेर चाहत्यांना पाहताच अली फजल भावूक झाला होता. त्याने याचा व्हिडीओ सोशळ मीडियावर देखील शेअर केला होता.
गेली पाच दशके गेइटी गॅलेक्सी चित्रपटगृह प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. मनोज देसाई यांनी 24 नोव्हेंबर 1972 ला या चित्रपटगृहाची स्थापना केली होती. स्थापना झाली त्यावेळी गेइटी, गॅलेक्सी आणि जेमिनी अशा तीन स्क्रिन होत्या. त्यानंतर ग्लॅमर, जेम, गाॅसिप आणि ग्रेस अशा चार नवीन स्क्रिन जोडण्यात आल्या. बहुचर्चित सीता और गीता या रमेश सिप्पी यांच्या चित्रपटाच्या प्रदर्शनापासून या चित्रपटगृहाच्या प्रवासाला सुरुवात झाली होती. त्यानंतर मुंबईच्या मनोरंजन विश्वामध्ये गेइटी गॅलेक्सीने आपले हक्काचे स्थान निर्माण केले होते. त्यामुळे सध्या सुरू असलेला तात्पुरता बंद हा चित्रपटप्रेमींसाठीही चर्चेचा विषय ठरला आहे.
Comments are closed.